चीनचे सीमारेषेवर रस्ते, विमानतळ, हेलिपॅडही; पेंटागॉनचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2023 09:45 AM2023-10-23T09:45:29+5:302023-10-23T09:46:03+5:30
चीनने लष्करी डोकलामजवळ तीन नवीन गावांची उभारणी, दुहेरी-उद्देशीय विमानतळ आणि हेलिपॅड निर्मिती केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : १५ जून २०२० मध्ये गलवान खोऱ्यात झालेल्या संघर्षानंतर भारत आणि चीनमधील संबंध ताणलेलेच आहेत. वारंवार दोन्ही देशांमध्ये चर्चेच्या फेऱ्या झडत असताना चीनकडून मात्र कुरापतीचे प्रयत्न सुरूच आहेत. चीनने २०२२ मध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर आपल्या जवानांची संख्या प्रचंड वाढविली होती, याचवेळी भूमिगत साठवण सुविधा, नवीन रस्ते, दुहेरी-उद्देशीय विमानतळ आणि हेलिपॅड निर्मिती करण्यात येत होती, अशी धक्कादायक बाब समोर आली आहे.
अमेरिकेचे संरक्षण विभाग मुख्यालय पेंटागॉनच्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. ‘मे २०२० च्या सुरुवातीपासून, भारत-चीन सीमेवरील सततच्या तणावाने चीनच्या पश्चिमी कमांडचे लक्ष वेधून घेतले होते. भारत आणि चीनमधील एलएसीवरील सीमांकनांच्या संदर्भात भिन्न धारणा, दोन्ही बाजूंच्या अलीकडील पायाभूत सुविधांची उभारणी, आदींमुळे तणाव वाढून अनेक चकमकी झाल्या’, असे अहवालात म्हटले आहे. चीनने अशाच प्रकारे संयुक्त शस्त्रास्त्र ब्रिगेडची पूर्व आणि मध्य कमांडमध्ये तैनात केल्याचे अहवालात म्हटले आहे. ५०० पेक्षा अधिक सक्रिय अण्वस्त्रे चीनकडे आहेत. १,००० पेक्षा अधिक सक्रिय अण्वस्त्रे २०३० पर्यंत वाढविण्याची चीन तयारी करत असल्याचे सूत्रांनी माहिती देताना सांगितले.
नेमके काय केले?
चीनने लष्करी पायाभूत सुविधांचा विकास करताना डोकलामजवळील भूमिगत साठवण सुविधा, एलएसीच्या तीनही क्षेत्रांतील नवीन रस्ते, शेजारील भूतानमधील विवादित भागात तीन नवीन गावांची उभारणी, पँगाँग सरोवरावरील दुसरा पूल, केंद्र क्षेत्राजवळ दुहेरी-उद्देशीय विमानतळ आणि हेलिपॅड, आदींचा समावेश आहे.
संरक्षणमंत्र्यांचे सीमेवर शस्त्रपूजन
भारत आणि चीन यांच्यात पूर्व लडाखमध्ये तीन वर्षांपासून संघर्ष सुरू असताना संरक्षण मंत्री राजनाथ सिंग मंगळवारी अरुणाचल प्रदेशातील तवांग येथील सीमारेषेजवळच्या जवानांसोबत दसरा साजरा करणार आहेत. संरक्षण मंत्री तवांगमध्ये ‘शस्त्रपूजन’ही करणार आहेत.