"त्या सैनिकाला ताबडतोब सोडा"; चीनची भारतीय लष्कराकडे मागणी
By देवेश फडके | Published: January 10, 2021 12:02 PM2021-01-10T12:02:14+5:302021-01-10T12:04:56+5:30
पीपल्स लिबरेशन आर्मी या चिनी लष्कराच्या सैनिकाने प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ओलांडून भारतीय हद्दीत घुसखोरी केली होती. या सैनिकाला तात्काळ सोडावे, अशी मागणी आता चीनकडून करण्यात आली आहे.
लडाख : पँगाँग सरोवराच्या दक्षिण भागातून एका चिनी सैनिकाला भारतीय लष्कराकडून ताब्यात घेण्यात आले होते. पीपल्स लिबरेशन आर्मी या चिनी लष्कराच्या सैनिकाने प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ओलांडून भारतीय हद्दीत घुसखोरी केली होती. या सैनिकाला तात्काळ सोडावे, अशी मागणी आता चीनकडून करण्यात आली आहे.
भारतीय हद्दीत घुसखोरी केलेल्या एका चीनी सैनिकाला ताब्यात घेतले असल्याची माहिती शनिवारी अधिकृतरित्या भारतीय लष्कराकडून देण्यात आली. पँगाँग सरोवराच्या दक्षिणेकडील चुशूल सेक्टरमध्ये असलेल्या गुरंग भागात शुक्रवारी पहाटे ही घटना घडली होती. या चिनी सैनिकाने कोणत्या परिस्थितीत सीमा पार केली याचा शोध भारतीय लष्कराकडून घेतला जात आहे.
अंधार असल्यामुळे तो सैनिक रस्ता चुकला. कठीण भौगिलिक परिस्थितीमुळे तो सैनिक भारत-चीन सीमेवर बेपत्ता झाला होता. त्या सैनिकाचा शोध घेता यावा, म्हणून याबाबतची माहिती भारतीय लष्कराला देण्यात आली होती, अशी माहिती चीनच्या लष्कराकडून एका ऑनलाइन साइटवर टाकण्यात आली होती. दोन तासांनंतर भारतीय लष्कराकडून यासंदर्भात प्रतिसाद देण्यात आला. चीनचा बेपत्ता झालेला सैनिक सापडल्याचे भारतीय लष्कराकडून सांगण्यात आले. सक्षम प्राधिकरणाकडून निर्देश येतील, त्यानुसार त्या सैनिकाला पुन्हा चीनकडे सुपूर्द करण्यात येईल, अशी माहिती देण्यात आली आहे.
एका कराराची आठवण करून देत या वेबसाइटने लिहिले आहे की, भारतीय लष्कराने प्रासंगिक कराराचे तंतोतंत पालन केले पाहिजे आणि वेळ न दवडता त्या सैनिकाला पुन्हा चीनकडे पाठवले पाहिजे. जेणेकरून दोन्ही देशात सुरू असलेला तणाव कमी करण्यात सकारात्मक पावले उचलली जाऊ शकतील आणि दोन्ही देशांकडून सीमेवर शांतता प्रस्थापित केली जाऊ शकेल.
दरम्यान, यापूर्वी १९ ऑक्टोबर २०२० रोजी लडाखमधील डेमचोक सेक्टरमध्ये एका चिनी सैनिकाला भारतीय लष्कराकडून ताब्यात घेण्यात आले होते. मात्र, निर्धारित नियमावलीचे पालन करून त्याला पुन्हा चीनकडे सुपूर्द करण्यात आले होते. सन २०२० च्या पूर्वार्धापासून प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या दोन्ही बाजूला भारत आणि चीनचे सैन्य तैनात करण्यात आले आहे. सध्या दोन्ही देशांच्या लष्करामध्ये चर्चा सुरू आहे. मात्र, त्यावर समाधानकारक तोडगा अद्याप निघालेला नाही. कडाक्याच्या थंडीमुळे चिनी सैन्याच्या हालचाली मंदावल्या असल्या तरी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील वातावरण मात्र तापलेलेच आहे.