चीनच्या कुरापती, अरुणाचल प्रदेशातील 11 ठिकाणांची नावे बदलली, गेल्या सहा वर्षांत तिसऱ्यांदा असे कृत्य
By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2023 09:49 AM2023-04-04T09:49:37+5:302023-04-04T09:50:35+5:30
मीडिया रिपोर्ट्सनुसार, चीनच्या नागरी व्यवहार मंत्रालयाने रविवारी अरुणाचल प्रदेशातील 11 ठिकाणांच्या नावांची यादी जारी केली आहे.
नवी दिल्ली : अरुणाचल प्रदेशावरूनभारतासोबतचीनचा वाद पुन्हा एकदा वाढला आहे. भारताच्या या भागावर आपला हक्क सांगण्यासाठी चीनने तिसरी नावांची यादी चीनी, तिबेटी आणि पिनयिन या तीन भाषांमध्ये जारी केली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, चीनच्या नागरी व्यवहार मंत्रालयाने रविवारी अरुणाचल प्रदेशातील 11 ठिकाणांच्या नावांची यादी जारी केली आहे. यामध्ये दोन मैदानी प्रदेश, दोन निवासी क्षेत्रे, पाच टेकड्या आणि दोन नद्यांचा समावेश आहे.
दरम्यान, चीनने अरुणाचल प्रदेशातील ठिकाणांची नावे एकतर्फी बदलण्याची ही तिसरी वेळ आहे. याआधी एप्रिल 2017 आणि डिसेंबर 2021 मध्ये असे कृत्य केले होते. 2017 मध्ये सहा आणि 2021 मध्ये 15 ठिकाणांची नावे बदलण्यात आली होती. आता तिसऱ्या यादीत 11 ठिकाणांची नावे बदलण्यात आली आहेत. अरुणाचल प्रदेशातील काही ठिकाणांची नावे बदलण्याच्या चीनच्या हालचाली भारताने याआधी फेटाळल्या आहेत.
अरुणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य भाग आहे आणि नेहमीच राहील, असे भारताच्या बाजूने नेहमीच म्हटले जाते. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी डिसेंबर 2021 मध्ये सांगितले होते की, चीनने अरुणाचल प्रदेशातील ठिकाणांचे अशा प्रकारे नामांतर करण्याचा प्रयत्न करण्याची ही पहिलीच वेळ नाही. दुसरीकडे, चीनच्या मीडिया रिपोर्टमध्ये इन्स्टिट्यूट ऑफ चायनीज बॉर्डरलँड स्टडीज, चायनीज अकादमी ऑफ सोशल सायन्सेसच्या झांग योंगपानचा हवाला देऊन असे म्हटले आहे की, नावांचे प्रमाणीकरण करण्याचे चीनचे पाऊल त्यांच्या सार्वभौमत्वात येते.
भविष्यात या प्रदेशातील अधिक प्रमाणित ठिकाणांची नावे जाहीर केली जातील, असे बीजिंगमधील चायना तिबेटोलॉजी रिसर्च सेंटरचे तज्ज्ञ लियान झियांगमिन म्हणाले. दरम्यान, 2017 मध्ये तिबेटचे आध्यात्मिक नेते दलाई लामा यांनी अरुणाचल प्रदेशला भेट दिल्यानंतर चीनने नावांची पहिली यादी जाहीर केली. याशिवाय, चीनने दलाई लामा यांच्या दौऱ्यावर बरीच टीका केली होती.