स्वत:चाच शब्द मोडत चीननं लडाखमधील फौजफाटा वाढवला; सीमेवरील वातावरण तापणार?
By कुणाल गवाणकर | Updated: January 24, 2021 17:09 IST2021-01-24T17:08:09+5:302021-01-24T17:09:42+5:30
देपसांगमध्ये चीनकडून अतिरिक्त सैनिक तैनात; भारतीय लष्कर सतर्क

स्वत:चाच शब्द मोडत चीननं लडाखमधील फौजफाटा वाढवला; सीमेवरील वातावरण तापणार?
बीजिंग: प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील फौजफाटा वाढवायचा नाही, असा प्रस्ताव चीननं चार महिन्यांपूर्वी दिला होता. मात्र या प्रस्तावाचं चीनकडूनच उल्लंघन करण्यात आलं आहे. चीननं पूर्व लडाखमधील सैनिकांची संख्या गुपचूप वाढली आहे. त्यामुळे या भागातील चीनची स्थिती मजबूत झाली आहे. इंडिया टुडेनं याबद्दल वृत्त दिलं आहे. चीननं पूर्व लडाखमध्ये फौजफाटा वाढवल्यानं सीमेवरील तणाव वाढण्याची चिन्हं आहेत.
पूर्व लडाखमध्ये तणाव निर्माण झाला असताना सप्टेंबरमध्ये दोन्ही देशांनी संयुक्त निवेदन प्रसिद्ध केलं. परिस्थिती आणखी जटिल होईल असं कोणतंही पाऊल उचललं जाणार नाही, यावर दोन्ही बाजूंचं एकमत झालं होतं. मात्र लष्करातील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चीननं या प्रस्तावाचं उल्लंघन केलं आहे. चीननं लडाखमधील देपसांगमधील सैनिकांची संख्या वाढवून स्वत:ची स्थिती मजबूत केली आहे. दौलत बेग ओल्डीजवळच्या नव्या जागांवरही चीनकडून सैनिकांची संख्या वाढवण्यात येत आहे.
चीनकडून सुरू असलेल्या हालचाली पाहता भारतीय लष्कर सतर्क आहे. सध्याच्या घडीला प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या दोन्ही बाजूला जवळपास ५०-५० हजार सैनिक तैनात आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची काळजी भारतीय लष्कराकडून घेतली जात आहे. काही दिवसांपूर्वीच दोन चिनी सैनिक भारतीय हद्दीत सापडले. रस्ता चुकल्यानं हे सैनिक भारतीय हद्दीत आले. भारताकडून त्यांना सुखरुप सीमेपलीकडे पाठवण्यात आलं. त्याआधी मे महिन्यात तणाव वाढल्यानंतर चिनी सैन्य सीमा ओलांडून ८ किलोमीटरपर्यंत आत शिरलं होतं.