भारतीयांनी निश्चय केला तर...; चीनला बसेल 'इतका' मोठ्ठा फटका; आकडा पाहून बसेल धक्का
By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2020 04:17 AM2020-06-20T04:17:46+5:302020-06-20T06:45:42+5:30
व्यापारी संघटनांनी वर्तविला अंदाज
कोलकाता : सीमेवर आगळीक करणाऱ्या चीनला धडा शिकविण्यासाठी चीनमधून भारतात येणाऱ्या मालावर बहिष्कार टाकावा यासाठी जनमत मोठ्या प्रमाणात संघटित होत आहे. भारताने चिनी वस्तूंच्या आयातीवर बहिष्कार टाकल्यास चीनमधून भारतात होणारी निर्यात वर्षाला १७ अब्ज अमेरिकन डॉलरपर्यंत कमी होण्याचा अंदाज व्यापारी संघटनांनी व्यक्त केला आहे.
चीनच्या आर्थिक नाड्या आवळण्यासाठी भारतात येणाऱ्या चिनी मालाला प्रतिबंध करावा तसेच ई-कॉमर्सद्वारे थेट ग्राहकांच्या दारात चिनी वस्तू पोहोचणार नाहीत यासाठी सरकारने प्रयत्न करावेत, अशी मागणी विविध संघटना तसेच व्यापारी संघटनांतर्फे करण्यात येत आहेत.
चीनमधून भारतात खेळणी, घरगुती वापराच्या वस्तू, मोबाइल, इलेक्ट्रिक तसेच इलेक्ट्रॉनिक्सच्या वस्तू, सौंदर्यप्रसाधने यासह औद्योगिक वापराच्या यंत्रसामग्री व सुट्या मालाची मोठ्या प्रमाणात आवक होत असते.
भारतातील किरकोळ व्यापारी दरवर्षी सुमारे १७ अब्ज अमेरिकन डॉलरच्या चिनी वस्तू विकत असल्याची माहिती विविध व्यापारी संघटनांनी दिली आहे. भारतात चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकला गेल्यास चीनची भारताला होणारी निर्यात मोठ्या प्रमाणात कमी होऊन त्या देशाला दरवर्षी १७ अब्ज अमेरिकन डॉलरचा फटका बसू शकतो, असे मतही या संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे.
फेडरेशन ऑफ ऑल इंडिया व्यापार मंडळ या संघटनेने आपल्या सभासदांना सध्या उपलब्ध असलेला चिनी माल विकून नंतर नव्याने आॅर्डर न देण्याची सूचना केली आहे. या संघटनेचे सरचिटणीस व्ही. के. बन्सल यांनी सांगितले की, आम्ही सरकारला ई-कॉमर्सच्या माध्यमातून थेट ग्राहकांपर्यंत पोहोचणाºया चीनमध्ये उत्पादित झालेल्या वस्तूंवर बंदी घालण्याची विनंती केली आहे.
कॉन्फेडरेशन आॅफ वेस्ट बेंगॉल ट्रेडर्स असोसिएशनचे अध्यक्ष सुशील पोद्दार यांनी पत्रकारांना सांगितले की, आम्ही आमच्या सभासदांना शक्यतोवर चिनी वस्तूंची विक्री न करण्याचा सल्ला दिला आहे.