चीनने भारतीय सीमेवर जमविले १८ हजार सैनिक, अरुणाचलमध्ये अतिरिक्त चार कॅब तैनात
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2023 08:39 IST2023-01-03T08:37:46+5:302023-01-03T08:39:03+5:30
प्रत्येक कॅबमध्ये ४५०० जवान, तोफखाना आणि यंत्रसामग्रीचा समावेश असतो, असे चीनवर लक्ष ठेवणाऱ्या निरीक्षकांनी सांगितले.

चीनने भारतीय सीमेवर जमविले १८ हजार सैनिक, अरुणाचलमध्ये अतिरिक्त चार कॅब तैनात
नवी दिल्ली : चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने (पीएलए) सिक्कीमलगतच्या २०० किमी व अरुणाचल प्रदेशलगतच्या ११२६ किमी लांबीच्या सीमेवर अतिरिक्त चार कॅब तैनात करणे सुरूच ठेवले आहे. प्रत्येक कॅबमध्ये ४५०० जवान, तोफखाना आणि यंत्रसामग्रीचा समावेश असतो, असे चीनवर लक्ष ठेवणाऱ्या निरीक्षकांनी सांगितले.
सिलीगुडीजवळच्या चुम्बी खोऱ्यात व तवांगजवळील कोना भागात प्रत्येकी एक तर अरुणाचल प्रदेशच्या वालोंग क्षेत्रालगत दोन कॅब तैनात करण्यात आल्या आहेत. कॅब माघारी जाण्याचे कोणतेही संकेत नाहीत. त्या हिवाळ्यातही प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ राहणार असल्याने भारतानेही सैन्य तैनातीत बदल केला आहे.
चीनला भारतच निपटू शकतो : राहुल गांधी
रशिया ज्याप्रमाणे युक्रेनला ‘नाटो’ मध्ये जाण्यापासून रोखण्यासाठी युद्धाच्या धमक्या देत होता, त्याचप्रमाणे भारताने अमेरिकेकडे झुकू नये म्हणून चीन घुसखोरीच्या कारवाया करत आहे, असे असले तरी चीनशी पाश्चिमात्य देश नव्हे तर भारतच निपटू शकतो, असे मत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी व्यक्त केले.
एमएनएमचे प्रमुख कमल हासन यांच्याशी संवाद साधत होते. चीनसोबतच्या सीमा समस्येचे कारण भारताची अंतर्गत परिस्थिती असल्याचे मतही राहुल गांधी यांनी व्यक्त केले. देशात अंतर्गत संघर्ष होतात, तेव्हा विरोधक या परिस्थितीचा फायदा घेतात, असे राहुल गांधी म्हणाले.