चीनमध्ये लढाईची धमक नाही, भारताला विश्वास
By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2017 12:13 PM2017-08-07T12:13:47+5:302017-08-07T12:31:04+5:30
सिक्कीमजवळच्या डोकलाममध्ये निर्माण झालेल्या संघर्षावरुन चीनकडून वारंवार युद्धाची भाषा केली जात असली तरी, चीन युद्धाचा धोका पत्करणार नाही
नवी दिल्ली, दि. 7 - सिक्कीमजवळच्या डोकलाममध्ये निर्माण झालेल्या संघर्षावरुन चीनकडून वारंवार युद्धाची भाषा केली जात असली तरी, चीन युद्धाचा धोका पत्करणार नाही किंवा मर्यादीत स्वरुपाच्या लढाईचे पाऊल सुद्धा उचलणार नाही असा विश्वास भारतीय सुरक्षा यंत्रणांना आहे. भूतानच्या हद्दीतील डोकलाममधून भारत आणि चीनने सैन्य मागे घेणे हाच दोन्ही देशांसाठी उत्तम पर्याय आहे असे सुरक्षा यंत्रणांमधील सूत्रांनी सांगितले.
सिक्कीम-भूतान-तिबेट या ट्राय जंक्शनजवळ चीनच्या रस्ता बांधणीच्या हट्टामुळे हा संपूर्ण संघर्ष निर्माण झाला आहे. चीनने उद्या अशी कोणती आगळीक केलीच किंवा युद्धाची परिस्थिती उदभवली तर भारतीय लष्कर उत्तर देण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहे असे भारतीय सुरक्षा दलातील सूत्रांनी सांगितले. गेल्या 50 दिवसांपासून हा संघर्ष सुरु असून युद्धा हा या समस्येवर उपाय नाही हे भारताने आधीच स्पष्ट केले आहे. व्दिपक्षीय चर्चा, संयमाने तणाव कमी होऊ शकतो असे परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी मागच्या आठवडयात संसदेत सांगितले आहे.
चीन ‘सर्जिकल स्ट्राइक’च्या तयारीत
भारतीय सैन्याला डोकलाम भागातून हटविण्यासाठी चीन तिथे छोटे युद्ध पुकारू शकते, असा इशारा चीनमधील तज्ज्ञांनी दिला आहे. सर्जिकल स्ट्राइकप्रमाणे ही कारवाई असेल, असे सांगण्यात येते. मोदी सरकार देशाला युद्धाच्या खाईत लोटत आहे, असा आरोपही चीनी वृत्तपत्रांनी केला आहे. डोकलाममध्ये चीनने रस्ता बांधण्याचे प्रयत्न केल्यापासून भारतीय सैन्य तिथे आहे. ते हटविण्यासाठी चीनी सैन्य दोन आठवड्यांत कारवाई करू शकते, असे तज्ज्ञांनी म्हटले आहे.
युद्धाची तयारी सुरू
भारताविरोधात चीन लष्करी ऑपरेशन करू शकते, असे शांघाय अकॅडमी ऑफ सोशल सायन्सेसमधील आंतरराष्ट्रीय विषयांचे संशोधक यांचे म्हणणे आहे. डोकलाममध्ये चीनी लष्कर शस्त्रास्त्रांचा वापरू शकतो, असे त्यांच्या युद्धाभ्यासावरून स्पष्ट होते. भारताची उक्ती व कृतीमध्ये खूपच अंतर आहे, असे सेंटर फॉर एशिया-पॅसिफिक स्टडी सेंटरचे संचालक जाओ गेनचेंग यांनीही म्हटले आहे. भारतीय सैन्याला माघार घेण्यास भाग पाडणे वा त्यांना ताब्यात घेणे, हा चीनचा या ऑपरेशनचा हेतू असेल.