'चीन घुसला, तसंच आम्हीही कर्नाटकात घुसू'; संजय राऊतांचा कर्नाटकला थेट इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2022 01:10 PM2022-12-22T13:10:10+5:302022-12-22T13:13:43+5:30
बात इंच की नही है.... दिल्लीवाली सरकार म्हणतेय आम्ही चीनला घुसू देणार नाही, एक इंच भी घुसू देणार नाही.
नवी दिल्ली - दिल्लीत सीमाप्रश्नावर केंद्रीय गृहमंत्री आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री सोबत झालेली बैठक सीमा प्रश्नासाठी नव्हे तर सीमेवरील कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी होती असे घुमजाव कर्नाटकाचेमुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केले. यानंतर आता महाराष्ट्रातील विरोधी नेत्यांनीही सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकारवर टीकास्त्र सोडले. यातच आता कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) यांनी महाराष्ट्रातील विरोधकांवर टीका केली आहे. त्यावरुन, आता शिवसेना नेते खासदार संजय राऊत हेही आक्रमक झाले आहेत. राऊत यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना थेट इशारा दिला असून केंद्र सरकारवरही निशाणा साधाला आहे.
बात इंच की नही है.... दिल्लीवाली सरकार म्हणतेय आम्ही चीनला घुसू देणार नाही, एक इंच भी घुसू देणार नाही. इंच इंच करत बसले पण चीन घुसला, आम्हीही घुसणार... अशा शब्दात शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी कर्नाटक सरकारला इशारा दिला आहे. तसेच, घुसण्यासाठी आम्हाला कोणाच्या परवानगीची गरज नाही. पण, आम्ही मानतो की हा देश एक आहे, हा वाद चर्चेतून सुटू शकतो. पण, कर्नाटकचे मुख्यमंत्री जाणूनबुजून आग लावत आहेत. मात्र, महाराष्ट्रात कमजोर सरकार बसलंय, जे यावर भूमिका घेत नाही, असेही राऊत यांनी म्हटले.
महाराष्ट्रातील १०० पेक्षा अधिक लोकांनी कर्नाटक-बेळगांव लढ्यावर बलिदान दिलं आहे. मात्र, या विषयाबाबत राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री भूमिका घेत नसतील, तर बोम्मईसारखे लोकं आवाज वाढवून बोलणारच. आमचा सरकारशी, तेथील लोकांशी वैयक्तिक वाद नाही, हा गेल्या ७० वर्षांपूर्वीचा वाद आहे. हा मानवतेचा वाद आहे, तेथील मराठी लोकांवर अन्याय, अत्याचार आणि अट्रॉसिटी होत आहे, त्याविरुद्ध आमचा हा लढा आहे, असेही संजय राऊत यांनी म्हटले.
काय म्हणाले कर्नाटकचे मुख्यमंत्री
बसवराज बोम्मई यांनी महाराष्ट्रातील विरोधी पक्षनेत्यांवर टीका करताना म्हटले आहे की, त्यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे, अशी टीका करत, महाराष्ट्र विधानसभेतील विरोधी पक्षांच्या सदस्यांवर सीमारेषेचे राजकारण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप बोम्मई यांनी केला. ते पत्रकारांशी बोलत होते.