पूर्व लडाखच्या सीमेवर चीनने उभारला होता मोठा लष्करी तळ
By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2022 06:08 AM2022-09-18T06:08:04+5:302022-09-18T06:08:42+5:30
ड्रॅगनची हाेती माेठी तयारी, उपग्रहाने टिपलेल्या छायाचित्रांतून सत्य उजेडात
नवी दिल्ली : पूर्व लडाखमधील गोग्रा हॉट स्प्रिंग्ज या भागात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेलगत घुसखोरीचा प्रयत्न केला होता. त्या भागातून चिनी लष्कराने आपले सैनिक ३ किमी अंतरापर्यंत माघारी नेेले. दोन्ही देशांत याबाबत झालेल्या निर्णयानुसार हे पाऊल उचलण्यात आले. मात्र, गोग्रा हॉट स्प्रिंग्ज भागात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ चीनने मोठा लष्करीतळ उभारला होता, पण आता तो तळ चीनने हलविला आहे, असे एका उपग्रहाने टिपलेल्या छायाचित्रांतून स्पष्ट झाले आहे.
गोग्रा हॉट स्प्रिंग्ज येेथील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेलगतच्या भागात चीनने घुसखोरीचा प्रयत्न केला होता. त्या भागात चीनचे सैनिक येण्याआधीची व नंतरची उपग्रहाने काढलेली नवी छायाचित्रे उपलब्ध झाली आहेत.
तोफगोळ्यांच्या माऱ्याची केली होती सज्जता
चीनने गोग्रा हॉट स्प्रिंग्ज येथील प्रत्यक्ष नियंत्रणरेषेलगतच्या भागातून आपले सैन्य माघारी नेले, त्यावेळी हा मोठा लष्करीतळदेखील तिथून हलविला. तोफांनी सीमेपलीकडे मारा करण्यासाठी या तळाभोवती चीनने तसे मोर्चेदेखील बांधले होते. हे उपग्रहाद्वारे १५ सप्टेंबर टिपलेल्या छायाचित्रांतून स्पष्ट झाले आहे. या लष्करीतळाचे बांधकाम आता पाडले आहे. तसेच तेथील ढिगारा हलविण्यात आला आहे.
चीनने लष्करी तळ हलविला
या भागात दोन्ही देशांपैकी कोणीही पेट्रोलिंग करू नये असे ठरविण्यात आले होते. तरीही चीनच्या सैनिकांनी या भागात घुसखोरीचा प्रयत्न केला होता. इतकेच नव्हे तर मोठा लष्करीतळही उभारला होता. तो चीनने आता हलविला आहे.
सैन्य माघारीची प्रक्रिया झाली पूर्ण
पूर्व लडाखमधील गोग्रा हॉट स्प्रिंग्ज भागातील भारत व चीनचे सैन्य माघारी घेण्याची प्रक्रिया गेल्या मंगळवारी पूर्ण झाली. भारत व चीनच्या लष्करामध्ये कॉर्प्स कमांडर स्तरावर चर्चेच्या १६ व्या फेरीत सैन्य माघारीचा निर्णय घेण्यात आला होता. चीनच्या लष्कराने पूर्व लडाखमध्ये घुसखोरीचा प्रयत्न केला हाेता. गलवान खोऱ्यात दोन्ही देशांच्या सैन्यात झालेल्या संघर्षामुळे या तणावात भर पडली होती.