चीनची पँगाँग सरोवराजवळ कुरापत, बांधली मोठी बंकर्स

By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2024 09:08 AM2024-07-08T09:08:42+5:302024-07-08T09:09:42+5:30

शस्त्रास्त्रे  आणि दारूगोळा तसेच इंधनाचा साठा करून ठेवण्यासाठी हे बंकर्स बांधण्यात आल्याची माहिती आहे

China has built huge bunkers near Pangong Lake | चीनची पँगाँग सरोवराजवळ कुरापत, बांधली मोठी बंकर्स

चीनची पँगाँग सरोवराजवळ कुरापत, बांधली मोठी बंकर्स

नवी दिल्ली :चीनने पुन्हा एकदा पँगाँग सरोवराजवळ अनेक मोठी बंकर्स बांधल्याचे उपग्रहांकडून प्राप्त छायाचित्रांवरून स्पष्ट झाले आहे. चिनी सैनिक सरोवराच्या आसपास खोदकाम करीत असल्याचेही या छायाचित्रांत दिसून येते. शस्त्रास्त्रे  आणि दारूगोळा तसेच इंधनाचा साठा करून ठेवण्यासाठी हे बंकर्स बांधण्यात आल्याची माहिती आहे. इतकेच नव्हे, तर लष्करी वाहने पार्क करून ठेवता यावी, यासाठीदेखील पक्के बांधकाम केले जात आहे. 

पँगाँग सरोवराच्या उत्तर किनाऱ्यावरील पर्वतराजींमध्ये असलेल्या सिरजाप येथे पीपल्स लिबरेशन आर्मीचे सैनिकी मुख्यालय असून हा तळ आमच्या भूभागावर असल्याचा भारताचा दावा आहे. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेपासून हा तळ सुमारे पाच किमी दूर आहे. मे २०२० मध्ये जेव्हा या भूभागावरून विवाद सुरू झाला, त्यावेळी त्या ठिकाणी कोणतेही बांधकाम झालेले नव्हते.

अमेरिकन फर्म ‘ब्लॅकस्काय’ने जी उपग्रह छायाचित्रे जारी केली आहेत, त्यानुसार २०२१-२२ मध्ये पाया बांधल्यानंतर आता भूमिगत बंकर्स बांधलेले दिसतात. ३० मे रोजी घेण्यात आलेल्या छायाचित्रात बंकर्सचे प्रवेशद्वार स्पष्टपणे दिसतात. पाच प्रवेश द्वारवाला एक छोटा बंकर मोठ्या बंकरजवळ दिसतो.

नेमके कुठे आहेत बंकर्स

चीनचा हा तळ गलवानपासून १२० किमी दूर दक्षिण-पूर्वेला आहे. येथेच जून २०२० मध्ये उभय सैन्यामध्ये संघर्ष झाला.
 

Web Title: China has built huge bunkers near Pangong Lake

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.