सिक्कीमनंतर आता उत्तराखंडमध्ये चिनी सैन्याची घुसखोरी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2017 05:36 PM2017-07-31T17:36:26+5:302017-07-31T17:39:19+5:30
सिक्कीमजवळच्या डोकलाममध्ये भारत आणि चिनी सैन्यामधील संघर्ष कायम असताना आता उत्तराखंडच्या बाराहोतीमध्ये चिनी सैन्याचे घुसखोरी केल्याचे समोर आले आहे.
नवी दिल्ली, दि. 31 - सिक्कीमजवळच्या डोकलाममध्ये भारत आणि चिनी सैन्यामधील संघर्ष कायम असताना आता उत्तराखंडच्या बाराहोतीमध्ये चिनी सैन्याचे घुसखोरी केल्याचे समोर आले आहे. टाइम्स नाऊ वाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार चिनी सैनिक भारतीय हद्दीत एक किलोमीटर आतपर्यंत आले होते. भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या बिजींग भेटीच्या दोन दिवस आधी ही घटना घडली.
सिक्कीमजवळच्या डोकलाममध्ये भारत-चीन आणि भूतानची सीमा रेषा ज्या ट्राय जंक्शनवर मिळते तिथेही चीनने अशाच प्रकारची घुसखोरी केली आहे. भारताने चीनला इथे रस्ते बांधणीपासून रोखले असून, मागच्या महिन्याभरापासून दोन्ही देशांचे सैन्य समोरासमोर उभे ठाकले आहे. उत्तराखंडमध्ये घुसखोरीची घटना 25 जुलैला सकाळी नऊच्या सुमारास घडली. चिनी सैनिक भारतीय हद्दीत एक किलोमीटर आतपर्यंत घुसले होते अशी माहिती सूत्रांनी दिली.
मागच्यावर्षी सुद्धा जुलै महिन्यात दोन चिनी सैनिक बारहोलीमध्ये दोनशे मीटर आतपर्यंत आले होते. त्यावेळी तत्कालिन संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी दोन्ही देशांमध्ये सीमारेषेची आखणी झाली नसल्याचे सांगितले होते. त्यामुळे भारताने त्यावेळी या घटनेला घुसखोरी न ठरवता उल्लंघन म्हटले होते. एनएसए अजित डोवाल यांनी चिनी अधिका-यांची भेट घेतली पण अजूनही डोकलाममध्ये निर्माण झालेला तिढा सुटलेला नाही.
चीनची दादागिरी नाही खपवून घेणार
चीनकडून सातत्याने युद्धखोरीची भाषा केली जात असली तरी, भारताच्या भूमिकेत कोणताही बदल झालेला नाही. डोकलाममध्ये निर्माण झालेला वाद राजकीय आणि कुटनितीक चर्चेतून सोडवण्याचा भारताचा प्रयत्न चालू राहिल पण त्याचवेळी चीनने भूतानवर दादागिरीचा प्रयत्न केल्यास खपवून घेणार नसल्याचे भारताने स्पष्ट केले आहे. चीनच्या भूतानवरील कोणत्याही दडपशाहीला त्याच भाषेत प्रत्युत्तर देण्याची भारताची रणनिती असल्याचे सूत्रांनी सांगितले.
11 हजार फूट उंचीवर सिक्कीम-भूतान-तिबेट ट्राय जंक्शनवर हळूहळू भारताने आपली स्थिती मजबूत केली आहे. परिस्थिती आणि गरजेनुसार इथे अतिरिक्त सैन्य तुकडीची तैनाती केली जाईल. चीनच्या सरकारी माध्यमांमधून दररोज भारताला धमक्या, इशारे दिले जात असले तरी, भारताने कुटनितिक चर्चेचे दरवाजे उघडे ठेवले आहेत. ट्राय जंक्शन येथे असलेल्या डोकलाममध्ये चीनने रस्ते बांधणीचा प्रयत्न केल्यापासून या भागातील शांतता भंग पावली आहे.