नाद करायचा नाय! लडाखमधील कुरापती चीनला महागात; सर्वोच्च कमांडरचा मृत्यू, कित्येक सैनिक आजारी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2021 01:59 PM2021-10-07T13:59:54+5:302021-10-07T14:00:17+5:30
पूर्व लडाखमध्ये कुरघोड्या करण्याचा प्रयत्न ड्रॅगनच्या अंगलट; कित्येक सैनिक आजारी पडले
बीजिंग: पूर्व लडाख सीमेवरील कुरघोड्या चीनला महागात पडू लागल्या आहेत. लडाखवर कब्जा करण्याचे मनसुबे बाळगणाऱ्या चिनी सैन्याला मोठा दणका बसला आहे. चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीनं पूर्व लडाखला लागून असलेल्या सीमेवर जवळपास ५० हजार सैनिक तैनात केले आहेत. मात्र हाडं गोठवणाऱ्या थंडीनं आणि ऑक्सिजनचं प्रमाण कमी असल्यानं चिनी सैनिकांची अवस्था गंभीर झाली आहे. अनेक सैनिकांना पोटाच्या समस्या जाणवत आहेत.
हवामानात असलेला प्रचंड गारवा, ऑक्सिजनचं अपुरं प्रमाण, पोटाच्या समस्या यामुळे चीनच्या थिएटर कमांडचे कमांडर राहिलेल्या झांघ जुडोंग यांचा मृत्यू झाला आहे. चिनी सैन्यात पश्चिम थिएटर कमांड अतिशय महत्त्वाची मानली जाते. त्याच कमांडचं नेतृत्त्व केलेल्या जुडोंग यांना जीव गमवावा लागला आहे. ते केवळ ६ महिने लडाखमधील आव्हानात्मक परिस्थितीचा सामना करू शकले.
झांघ जुडोंग यांनी काही महिन्यांपूर्वीच चीनच्या पश्चिम थिएटर कमांडच्या प्रमुखपदाचा राजीनामा दिला होता. झांग यांना पोटाच्या समस्यांसोबतच कर्करोगही झाला होता, असं साऊथ चायना मॉर्निंग पोस्टनं आपल्या वृत्तात म्हटलं आहे. गेल्या ९ महिन्यांत तीनवेळा लष्कराच्या पश्चिम थिएटर कमांडचे प्रमुख बदलण्याची वेळ चीनवर आली आहे. चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीच्या पश्चिम कमांडचं मुख्यालय तिबेटमध्ये आहे. या कमांडकडे लडाखपासून अरुणाचल प्रदेशपर्यंतच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या सुरक्षेची जबाबदारी आहे.
चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी जूनमध्ये जनरल झांग यांच्या जागी जनरल शू क्यूलिंग यांची नियुक्ती केली. पुढच्या २ महिन्यांत त्यांची जागा जनरल वांग हैजियांग यांनी घेतली. डिसेंबर २०२० मध्ये जनरल झांग जुडोंग यांना कमांडर करण्यात आलं. १ ऑक्टोबरला त्यांचं निधन झालं. ते ५८ वर्षांचे होते. जूनमध्ये त्यांनी राजीनामा दिला. मात्र त्यावेळी त्यांनी राजीनाम्यामागचं कारण सांगितलं नव्हतं. झांग आणि शू यांच्याकडून जिनपिंग यांना मोठ्या अपेक्षा होत्या. ते जिनपिंग यांचे आवडते जनरल होते. त्यांच्यावर जिनपिंग यांचा मोठा विश्वास होता.