LAC वादासंदर्भात काय आहे चीनचा हेतू ? लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांनी केला खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2022 11:54 AM2022-05-10T11:54:54+5:302022-05-10T12:01:52+5:30
Army Chief General Manoj Pande : सीमेवर कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी भारतीय सैन्य पुरेशा प्रमाणात तैनात करण्यात आले आहे, असे लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे म्हणाले.
नवी दिल्ली : पूर्व लडाखमधील वास्तविक नियंत्रण रेषेवर (LAC) भारत आणि चीन यांच्यात जवळपास दोन वर्षांपासून संघर्ष सुरू आहे. आता लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे (Army Chief General Manoj Pande) यांनी तेथील सध्याच्या परिस्थितीवर मोकळेपणाने भाष्य केले आहे. ते म्हणाले की, चीनसोबतचा मूळ प्रश्न हाच सीमाप्रश्नावर तोडगा आहे, पण तो कायम ठेवण्याचा त्यांचा हेतू आहे. दरम्यान, जनरल मनोज पांडे यांनी एक आठवड्यापूर्वी भारतीय लष्कराची कमान हाती घेतली आहे.
सीमेवर कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी भारतीय सैन्य पुरेशा प्रमाणात तैनात करण्यात आले आहे, असे लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे म्हणाले. तसेच, एप्रिल 2020 पूर्वी पूर्वस्थिती पूर्ववत करणे हे भारतीय लष्कराचे उद्दिष्ट आहे आणि सीमेवर तैनात असलेल्या सैनिकांना त्यांच्या कामात ठाम राहण्यासाठी मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत, असे लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांनी सांगितले.
भारतीय लष्कर वास्तविक नियंत्रण रेषेवर महत्त्वात्या ठिकाणी तैनात आहे. लष्कर कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी मजबूत स्थितीत आहे. सीमेचे निराकरण हा मुख्य मुद्दा आहे. सीमाप्रश्न कायम ठेवण्याचा चीनचा हेतू असल्याचे आपण पाहतो. एक देश म्हणून आपल्याला 'संपूर्ण राष्ट्र' दृष्टीकोन आवश्यक आहे आणि लष्करी क्षेत्रात, वास्तविक नियंत्रण रेषेवरील स्थिती बदलण्याच्या कोणत्याही प्रयत्नांना रोखणे आणि त्याचा प्रतिकार करायचा आहे, असे लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे म्हणाले.
"चर्चेतून तोडगा निघेल, अशी आशा"
याचबरोबर, भारत आणि चीन यांच्यातील राजनैतिक आणि लष्करी चर्चेच्या परिणामी पॅंगॉन्ग लेक, गोगरा आणि गलवान येथील पेट्रोल सेंटर 14 च्या उत्तर आणि दक्षिण सीमेवरील सैन्य हटविण्यात आले आहे, असे लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांनी सांगितले. यासोबतच ते म्हणाले, 'उर्वरित क्षेत्रातही चर्चेतून तोडगा निघेल, अशी आशा आहे. दोन्ही बाजूंमध्ये विश्वास आणि शांतता प्रस्थापित करण्याचा उद्देश आहे, परंतु ते एका बाजूने होऊ शकत नाही.'