पाकिस्तानच्या मदतीसाठी चीन पाठवणार 1 लाखांची 'स्पेशल फोर्स'; जाणून घ्या नेमकं प्रकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2020 09:59 AM2020-02-28T09:59:23+5:302020-02-28T10:03:29+5:30
अलीकडेच, पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी टोळांशी लढा देण्यासाठी आपल्या देशात राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केली.
बीजिंग - अडचणीत सापडलेल्या मित्र पाकिस्तानच्या मदतीसाठी चीनने पुढाकार घेतला आहे. सध्या टोळ कीटकांमुळे पाकिस्तानला मोठा फटका बसला आहे. या कीटकांचा सामना करण्यासाठी चीनने पाकिस्तानला १ लाख बदकांची फौज पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.
स्थानिक वृत्तपत्र निंगो इव्हनिंगने दिलेल्या वृत्तानुसार चीन पूर्वेकडील झेजियांग प्रांतातून टोळ खाणाऱ्या बदकांना पाकिस्तानात पाठवले जाणार आहे. एक बदक साधारणपणे दिवसाला सुमारे २०० टोळ कीटक खाऊ शकतो. अशा परिस्थितीत ही १ लाख बदकांची फौज दिवसाला २ कोटी टोळ कीटकांना फस्त करु शकते असा विश्वास चीनच्या अधिकाऱ्यांना वाटतो.
तसेच दोन दशकांपूर्वी चीनच्या वायव्य भागात टोळ कीटकांनी हल्ला केला होता, त्यावेळी बदकांच्या मदतीने चीनने या संकटांवर मात केली होती. कृषी तत्रज्ञान तज्ज्ञ लू लिझी सांगतात की, बदकाचा वापर विषारी कीटकनाशकांच्या वापरापेक्षा खूपच स्वस्त असतो आणि त्यामुळे शेतीलाही नुकसान होत नाही. तसेच त्यांचा वापर पूर्णपणे नैसर्गिक आहे. बदके कोंबड्यांपेक्षा तीनपट टोळ खाऊ शकतात.
तसेच बदकांना एका गटात रहायला आवडते, म्हणून कोंबडीपेक्षा त्यांचे व्यवस्थापन करणे सोपे आहे. एक कोंबडी फक्त 70 टोळ खाऊ शकते तर त्या तुलनेत बदक दररोज 200 टोळ खाण्यास सक्षम आहे, गतवर्षी टोळ कीटकांनी पाकिस्तानवर आक्रमण केले होते.
अलीकडेच, पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी टोळांशी लढा देण्यासाठी आपल्या देशात राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केली. या टोळांनी पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील संपूर्ण पीके नष्ट केली. पंतप्रधान इम्रान खान यांनी कीटकांचा सामना करण्यासाठी राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केली. पाकिस्तानच्या बलुचिस्तान आणि येमेन हे टोळांचे प्रजनन केंद्र मानले जाते. येथे हिवाळ्यामध्ये टोळ किड्यांची पैदास होते. वारा बदलताच पाकिस्तान व इतर भागातून टोळ कीटक भारतात प्रवेश करतात. पावसामध्ये पाकिस्तानहून भारताकडे हे कीटक पोहचतात. टोळ नियंत्रणात पाकिस्तानकडे प्रभावी व्यवस्थापन नाही.
टोळ कीटक काय असतात?
टोळ नाकतोड्याचाच एक प्रकार आहे. या कीटकामुळे पिकांची दरवर्षी मोठ्या प्रमाणावर हानी होते. त्यांपैकी भारतात खुरपाडी, बिनपंखी नाकतोडा, पट्टेदार नाकतोडा, भातावरील नाकतोडा इ. नाकतोडे पिकांची हानी करतात.