भारताच्या एनएसजी समावेशाला चीनचा विरोध नाही- सुषमा स्वराज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2016 10:03 PM2016-06-19T22:03:20+5:302016-06-19T22:03:20+5:30
भारताच्या अणू पुरवठादार गटाच्या (एनएसजी) सदस्यत्वाला चीनचा विरोध नसल्याची माहिती आज परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी दिली.
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 19 - भारताच्या अणू पुरवठादार गटाच्या (एनएसजी) सदस्यत्वाला चीनचा विरोध नसल्याची माहिती आज परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी दिली. केवळ या गटामधील भारताच्या सदस्यत्वासंदर्भातील पात्रता प्रक्रियेसंदर्भात चीन साशंक आहे, असे स्वराज यांनी स्पष्ट केले. भारताला यंदा एनएसजीचे सदस्यत्व मिळवून देण्यास केंद्र सरकार प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन यावेळी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी पत्रकार परिषदेत केले. "भारताच्या एनएसजी सदस्यत्वाला चीनचा विरोध नाही. भारताचाही पाकिस्तानच्या एनएसजी सदस्यत्वाला विरोध नसल्याची भूमिका सुषमा स्वराज यांनी मांडली. एनएसजीचे सदस्यत्व मिळवण्यासाठी प्रयत्नात असलेल्या भारताचे परराष्ट्र सचिव एस. जयशंकर यांनी या आठवड्यात चीनचा दौरा केल्याचे वृत्त आज सूत्रांनी दिले. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरुप यांनी जयशंकर यांच्या या दौऱ्याविषयी माहिती देताना एनएसजीसहच इतर महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाल्याची माहिती दिली. एनएसजीची परिषद येत्या 23 आणि 24 जूनला दक्षिण कोरियाची राजधानी सेऊल येथे होणार आहे. या परिषदेदरम्यान भारताच्या सदस्यत्वासंदर्भात चर्चा केली जाण्याचा अंदाज वर्तवला आहे. याच वेळी पाकिस्तानच्या सदस्यत्वासंदर्भातही राजनैतिक चर्चा केली जाणार आहे.