चीनकडून कुठल्याही युद्धाची तयारी नाही, भारताने केले स्पष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2017 09:01 AM2017-07-20T09:01:25+5:302017-07-20T09:15:30+5:30
लडाख ते अरुणाचलप्रदेशपर्यंतच्या पट्ट्यामध्ये नियंत्रण रेषेजवळ चीनकडून मोठया प्रमाणावर सैन्य तैनाती सुरु असल्याचे वृत्त भारताने फेटाळून लावले आहे
Next
ऑनलाइन लोकमत
बिजींग, दि. 20 - लडाख ते अरुणाचलप्रदेशपर्यंतच्या पट्ट्यामध्ये नियंत्रण रेषेजवळ चीनकडून मोठया प्रमाणावर सैन्य तैनाती सुरु असल्याचे वृत्त भारताने फेटाळून लावले आहे तसेच तिबेटमध्ये चिनी लष्कर कोणताही युद्ध सराव करत नसल्याचे भारतीय सूत्रांनी म्हटले आहे. चीन तिबेटच्या डोंगराळ भागात हजारो टनांची लष्करी सामुग्री पाठवून युद्धाची तयारी करत आहे असे वृत्त बुधवारी चिनी प्रसारमाध्यमांनी दिले होते. त्यापार्श्वभूमीवर भारताने चीनकडून अशा कोणत्याही हालचाली होत नसल्याचे स्पष्ट केले आहे.
अशा प्रकारचे वृत्तांकन हा चीनच्याच रणनितीचा एक भाग आहे. सिक्कीमजवळच्या डोकलाममधून भारतीय सैन्याने माघार घ्यावी यासाठी दबाव वाढवण्याच्या रणनितीचा हा एक भाग आहे. डोकलाममध्ये चीनला रस्ते बांधण्यापासून रोखल्यापासून भारत आणि चीनमध्ये तणाव निर्माण झाला आहे. मागच्या महिन्याभरापासून दोन्ही देशांचे सैन्य समोरासमोर उभे ठाकले आहे. चीनच्या तिबेटमधल्या युद्धसरावावर फार चर्चा झाली असली तरी, त्यात फार काही विशेष नाही.
ल्हासामध्ये झालेल्या कवायती या नियमित वार्षित सरावाचा एक भाग होत्या. जूनच्या सुरुवातीला हा सराव झाला होता. सर्व देशांची लष्करे काही महिन्यांच्या अंतराने असे सराव करत असतात त्यात विशेष असे काही नाही. तिबेटमध्ये चीन 2009 पासून अशा प्रकारचा सराव करत आहे असे भारतीय सूत्रांनी सांगितले.
आणखी वाचा
चीन तिबेटच्या डोंगराळ भागात हजारो टनांची लष्करी सामुग्री पाठवत असल्याचे वृत्त काल चिनी माध्यमांनी दिले होते. पश्चिम थिएटर कमांडने उत्तर तिबेटच्या कुनलून पर्वतरांगामध्ये हजारो टनांची सैन्य सामुग्री पाठवली आहे. पश्चिम थिएटर कमांडकडे शिनजियांग आणि तिबेटवर देखरेख ठेवण्याची जबाबदारी असून हीच कमांड भारताबरोबरचे सीमा विषय हाताळते. चीनकडे यादोंगपासून ल्हासापर्यंत पसरलेल्या रेल्वे आणि रस्ते नेटवर्कच्या माध्यमातून लष्करी सामुग्री सिक्कीमच्या नाथू -ला पर्यंत पोहोचवण्याची क्षमता आहे. चीनी सैन्याला एक्सप्रेस वे नेटवर्कच्या माध्यमातून 700 किलोमीटरचे हे अंतर कापण्यासाठी फक्त सहा ते सात लागू शकतात.
तिढा वाढला! भारतापाठोपाठ चीननेही डोकलाममध्ये ठोकले तंबू
ग्लोबल टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, या सरावात पिपल्स लिबरेशन आर्मीच्या तिबेट मिलिट्री कमांड आणि चीनच्या पठार डोंगराळ भागात तैनात असणा-या ब्रिगेडने भाग घेतला. पिपल्स लिबरेशन आर्मी तिबेटमधील भारत - चीन सीमारेषेवर तैनात असते. तिबेटला जोडण-या डोंगराळ भागांमध्ये हे सैन्य तैनात असतं. सीसीटीव्ही वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, हे सैन्य गेल्या खूप दिवसांपासून ब्रम्हपुत्र नदीच्या मध्य आणि खालील भागात तैनात आहे.
चीनी सैनिकांनी केलेल्या सराव अभ्यासात हल्ल्यादरम्यान कशाप्रकारे इतर तुकड्या एकत्रित येऊन उत्तर देतील याचा अभ्यास करण्यात आला. यासंबंधीचा एक व्हिडीओ ऑनलाइन पोस्ट करण्यात आला आहे ज्यामध्ये ग्रेनेड आणि मिसाईलचा वापर करण्यात आल्याचं दाखवण्यात आलं.
या व्हिडीओमध्ये कशाप्रकारे रडार युनिटच्या सहाय्याने शत्रुच्या विमानाचा पत्ता लावला जाऊ शकतो, आणि सैनिक ते नेस्तनाभूत करु शकतात हेदेखील दाखवण्यात आलं. जवळपास 11 तासाहून जास्त वेळ हा सराव अभ्यास चालू होता.