"काँग्रेसमुळे देशाचे नुकसान, ८० च्या दशकापासून चीनचा भारतीय जागेवर कब्जा"; भाजप खासदार
By देवेश फडके | Published: January 19, 2021 01:22 PM2021-01-19T13:22:31+5:302021-01-19T13:25:43+5:30
अरुणाचल प्रदेशजवळ चीनकडून गावे वसवली जात असल्याबाबत येथील भारतीय जनता पक्षाचे (भाजप) खासदार तापिर गाओ यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे.
ईटानगर :अरुणाचल प्रदेशजवळचीनकडून गावे वसवली जात असल्याबाबत येथील भारतीय जनता पक्षाचे (भाजप) खासदार तापिर गाओ यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे. काँग्रेसच्या धोरणांमुळे संपूर्ण देशाचे नुकसान होत आहे, असे गाओ यांनी सांगितले.
८० च्या दशकापासून चीन सतत भारतीय भूभागांवर कब्जा करत आहे. चीनकडून गावे वसवणे, लष्करी छावणी बांधणे ही काही नवीन गोष्ट नाही. काँग्रेसच्या चुकीच्या धोरणांमुळे संपूर्ण देशाला याची किंमत मोजावी लागत आहे, असा आरोप गाओ यांनी केला आहे.
Since the 80s till today, they (China) are occupying this area and construction of villages is not a new thing. They have already constructed military base between Bisa and Maza which is inside McMahon Line, under Indian territory: Tapir Gao, BJP MP from Arunachal Pradesh https://t.co/xKIE1h9YPy
— ANI (@ANI) January 19, 2021
अरुणाचल प्रदेशमधील सीमेपर्यंत पायाभूत सुविधांचे जाळे निर्माण करण्याचे काम काँग्रेस सरकारकडून करण्यात आलेले नाही. यामुळे तीन ते चार किलोमीटरचा बफर झोन सुटला. यावर आता चीनकडून कब्जा केला जात असल्याचा दावा खासदार गाओ यांनी केला. उलटपक्षी, चीनने ८० दशकांपासून या भागात पायाभूत सुविधांचे जाळे निर्माण करण्यावर भर दिला. एवढेच नव्हे, तर लोंग्जू आणि माजा या भागापर्यंत रस्ते बांधणी केली, असेही गाओ यांनी सांगितले.
माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांच्या कार्यकाळात चीनने तवांग येथील सुमदोरोंग चू खोऱ्यावर ताबा मिळवला. तत्कालीन सैन्य प्रमुखांनी एका मोहिमेची आखणीही केली होती. मात्र, सरकारने त्यांना परवानगी दिली नाही, असे गाओ यांनी सांगितले.
दरम्यान, लडाख ते अरुणाचल प्रदेश या भागात असलेल्या सीमेवर चीनकडून सातत्याने कुरापती काढण्यात येत असून, या भागात निश्चित सीमारेषा नसल्याने चिनी सैन्याकडून या भागात सातत्याने घुसखोरी होत असते. अरुणाचल प्रदेशमधील भारताच्या हद्दीत चीनने घुसखोरी करून चक्क एक गाव वसवल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या गावामध्ये सुमारे १०१ घरे असल्याचे दिसत आहेत. हे गाव भारताच्या प्रत्यक्ष सीमेपासून साडे चार किलोमीटर आत वसले असल्याचा दावा करण्यात आला आहे.