चीनकडून युद्धाची तयारी? भारताच्या तीन राज्यांच्या सीमेवर सैनिकांसह मोठ्या प्रमाणात तैनात केली शस्रास्रे
By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2020 02:25 PM2020-06-25T14:25:31+5:302020-06-25T17:21:46+5:30
गलवानमधील संघर्षानंतर निर्माण झालेला तणाव कमी करण्यासाठी दोन्ही देशांकडून सैनिकी आणि राजनयिक स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. मात्र एकीकडे चर्चेसाठी समोर येत असलेला चीन पाठीमागून युद्धाची जोरदार तयारी करत असल्याचे समोर आले आहे.
नवी दिल्ली - लडाखमधील गलवान खोऱ्यात चीन आणि भारताच्या सैनिकांमध्ये झालेल्या हिंसक झटापटीनंतर दोन्ही देशांमध्ये कमालीचा तणाव निर्माण झालेला आहे. हा तणाव कमी करण्यासाठी दोन्ही देशांकडून सैनिकी आणि राजनयिक स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. मात्र एकीकडे चर्चेसाठी समोर येत असलेला चीन पाठीमागून युद्धाची जोरदार तयारी करत असल्याचे समोर आले आहे. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेला लागून असलेल्या अरुणाचल प्रदेश, सिक्कीम आणि उत्तराखंडमध्ये पीएलएच्या सैनिकांची आणि शस्त्रास्त्रांची तैनाती वाढत आहे.
एका रिपोर्टनुसार पँगाँग सरोवर, गलवान खोऱ्यासोबतच पूर्व लडाखमधील काही भागात चीनच्या सैनिकांची संख्या वाढत आहे. गलवानसोबतच डेमचोक आणि दौलत बेग ओल्डीमध्येसुद्धा भारत आणि चीनचे सैनिका आमनेसामने आलेले आहेत. बुधवारी भारत आणि चीनमध्ये राजनयिक स्तरावरील चर्चा झाली होती. पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यात १५ जून रोजी चीनच्या पीपल्स लीबरेशन आर्मीच्या सैनिकांनी भारताच्या जवानांवर पूर्वनियोजित पद्धतीने हल्ला केला होता. त्यात भारताच्या २० जवानांना वीरमरण आले आहे.
पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार पेंगाँग सरोवर, गलवान खोरे आणि पूर्व लडाखमधील संवेदनशील भागात चीनने आपल्या सैनिकांची संख्या वाढवली आहे. तसेच भारताच्या तीव्र विरोधानंतरही पॉईंट-१४ जवळ चीनने पुन्हा एकदा बांधकाम केले आहे. मात्र या वृत्तानुसार सर्वात चिंताजनक बाब म्हणजे अरुणाचल प्रदेश, उत्तराखंड आणि सिक्कीम या राज्यांना लागून असलेल्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर चीनच्या सैन्याने मोठ्या प्रमाणात सैनिक, दारुगोळा आणि शस्त्रास्त्रांचे प्रमाण वाढवले आहे.
दरम्यान, दोन्ही देशांमध्ये असलेला तणाव कमी करण्यासाठी भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे संयुक्त सचि (पूर्व आशिया) नवीन श्रीवास्तव आणि चीनच्या परराष्ट्र मंत्रालयातील डीडी वू जियांगहाओ यांच्यात बुधवारी चर्चा झाली होती. या चर्चेमध्ये दोन्ही देशांनी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेचे पालन करावे आणि त्याचा सन्मान करावा असे निश्चित झाले होते. तत्पूर्वी २२ जून रोजी भारताच्या १४ कॉर्प्सचे कमांडर लेफ्टिनंट हरिंदर सिंह आणि तिबेट मिलिट्री डिस्ट्रिक्टचे कमांडर मेजर जनरल लियू लिन यांच्या ११ तास मॅरथॉन बैठक पार पडली होती.
इतर महत्त्वाच्या बातम्या
योगगुरू ते उद्योगगुरू! एकेकाळी सायकलवरून विकायचे च्यवनप्राश, आता करतात अब्जावधीची उलाढाल
coronavirus: वृद्ध आणि आजारी व्यक्तींनंतर आता कोरोना करतोय तरुणांना टार्गेट, तज्ज्ञांनी दिला धोक्याचा इशारा
coronavirus: कोरोनामुक्त झालेल्या व्यक्तींना भविष्यात करावा लागू शकतो या समस्यांचा सामना
गलवानमध्ये किती सैनिक मारले गेले, सरकारच्या मौनामुळे चिनी नागरिक संतापले
मंगळ ग्रहावरील वस्तीत राहतील किती माणसं? अखेर मिळालं मोठ्या प्रश्नाचं उत्तर
कर्नल धारातीर्थी पडताच बिहार रेजिमेंटचे जवान भडकले, १८ जणांच्या माना मोडत चिन्यांना झोडपले
भारतच नाही एकूण २३ देशांच्या भूमीवर दावा, असे आहे चीनचे विस्तारवादी धोरण....
ती संधी साधली आणि चीन अमेरिकेला आव्हान देणारी महासत्ता बनली