चीनमधील नवीन आजाराने भारताचं वाढलं टेन्शन?, 6 राज्यांना अलर्ट, लोकांना दिला 'हा' सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2023 04:06 PM2023-11-29T16:06:08+5:302023-11-29T16:09:24+5:30
चीनमधील मुलांमध्ये न्यूमोनियाच्या रुग्णांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून राज्यांतील रुग्णालये, आरोग्य कर्मचाऱ्यांना श्वसनाच्या समस्या असलेल्या रुग्णांना तातडीने हाताळण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
चीनमधील मुलांमध्ये वेगाने वाढणाऱ्या श्वसनाच्या आजारामुळे भारत सरकारने 6 राज्यांमध्ये अलर्ट जारी केला आहे, ज्यामध्ये राजस्थान, कर्नाटक, गुजरात, उत्तराखंड, तामिळनाडू आणि हरियाणा यांचा समावेश आहे. चीनमधील मुलांमध्ये न्यूमोनियाच्या रुग्णांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून या राज्यांतील रुग्णालये आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना श्वसनाच्या समस्या असलेल्या रुग्णांना तातडीने हाताळण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कर्नाटक सरकारने आपल्या राज्यातील लोकांना फ्लूबद्दल जागरुक राहण्यास सांगितलं आहे.
लोकांना खोकताना किंवा शिंकताना तोंड आणि नाक झाकण्याचा सल्ला देण्यात आला आहे, वारंवार हात धुवा, चेहऱ्याला स्पर्श करणं टाळा आणि गर्दीच्या ठिकाणी मास्क घाला. स्थानिक रिपोर्ट म्हटलं आहे की, राजस्थान आरोग्य विभागाने दिलेल्या सल्ल्यात म्हटलं आहे की परिस्थिती सध्या चिंताजनक नाही. परंतु वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी सतर्क राहावे आणि संसर्गजन्य रोगांचा प्रसार रोखला पाहिजे. बालरोग विभाग आणि वैद्यकीय विभागांमध्ये पुरेशी व्यवस्था करण्यात यावी, असे राजस्थानने म्हटले आहे.
गुजरात, उत्तराखंडमध्ये आरोग्य विभागाचा इशारा
गुजरातचे आरोग्य मंत्री हृषिकेश पटेल यांनी दिलेल्या माहितीनुसार, चीनमधील परिस्थिती पाहता खबरदारीचा उपाय म्हणून कोविड-19 महामारीच्या काळात तयार करण्यात आलेल्या आरोग्य सेवा-सुविधा मजबूत केल्या जात आहेत. सरकारने अधिकाऱ्यांना त्यांच्या तयारीचा आढावा घेण्यास सांगितले आहे. त्याच वेळी, उत्तराखंडच्या आरोग्य अधिकार्यांना श्वसनाच्या आजारांच्या प्रकरणांवर देखरेख वाढवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कारण उत्तराखंडमधील चमोली, उत्तरकाशी आणि पिथौरागड हे तीन जिल्हे चीनच्या सीमेला लागून आहेत.
तमिळनाडू देखील पावलं उचलत आहे. तसेच सरकारी आणि खासगी रुग्णालयांनाही तसे आदेश दिले आहेत. राज्याच्या आरोग्य विभागाच्या निवेदनात म्हटले आहे की राज्यात आतापर्यंत मुलांमध्ये न्यूमोनियाची एकही घटना आढळली नसली तरी खबरदारीचा उपाय म्हणून अधिकाऱ्यांना जागरुक राहण्यास सांगण्यात आले आहे. केंद्राने 24 नोव्हेंबर रोजी सांगितले की चीनमधील सध्याच्या इन्फ्लूएंझा परिस्थितीमुळे उद्भवलेल्या कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीसाठी भारत तयार आहे आणि H9N2 उद्रेक आणि त्या देशातील मुलांमधील श्वसन आजाराच्या प्रकरणांवर लक्ष ठेवत आहे.