चीन म्हणते, आम्ही नव्हे, भारतानेच केली घुसखोरी!
By admin | Published: June 28, 2017 02:13 AM2017-06-28T02:13:30+5:302017-06-28T02:13:30+5:30
सिक्कीमच्या डोका ला भागात चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीच्या (पीएलए) जवानांनी सीमा ओलांडून घुसखोरी केल्याच्या
बीजिंग : सिक्कीमच्या डोका ला भागात चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीच्या (पीएलए) जवानांनी सीमा ओलांडून घुसखोरी केल्याच्या भारताच्या म्हणण्याचा केवळ इन्कार करून न थांबता चीनने उलट भारतानेच त्यांच्या प्रदेशात बेकायदा शिरकाव केल्याचा आरोप केला असून त्याबद्दल राजनैतिक पातळीवर औपचारिक निषेधही नोंदविला आहे.
सिक्कीम सीमेवर दोन्ही देशांमध्ये हद्दवादाच्या तिढ्यातून निर्माण झालेल्या तणावामुळेच आपण मानसरोवर यात्रेकरूंना कदापि नथु ला खिंडीतून पुढे जाऊ देणार नाही, असा इशाराही चीनने केला आहे. जूनच्या सुरुवातीस ‘पीएलए’चे सैनिक डोका ला भागात सीमा ओलांडून भारतात आले व त्यांची भारतीय सैनिकांशी धक्काबुक्कीही झाली. चिनी सैनिकांनी भारताचे दोन बंकरही नष्ट केले, असे वृत्त सूत्रांनी सोमवारी दिले होते. यावर चीन परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी भारतीय सैनिकांनीच निर्धारित सीमा ओलांडून आमच्या प्रदेशात घुसखोरी केली, असा उलटा आरोप बीजिंगमध्ये केला. (वृत्तसंस्था)