चीनची दुतर्फा नाकाबंदी! पर्वतांवर भारताची अपाचे, मिग २९, मिराज २००० लढाऊ विमानं अन् समुद्रात अमेरिकेच्या युद्धनौका
By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2020 03:15 PM2020-07-07T15:15:15+5:302020-07-07T15:29:15+5:30
तैवान, व्हिएतनाम आणि जपानशीही चीनचे सीमावाद सुरूच आहे.
नवी दिल्लीः चीनमध्ये उत्पत्ती झालेल्या कोरोना व्हायरसनं जगभरात धुमाकूळ घातला आहे. विशेष म्हणजे चीनमधून हा व्हायरस बाहेर पडून जगभरात पसरला. अनेक देशांना या व्हायरसनं कवेत घेतलं असून, चीनविरोधातील संताप उफाळून येऊ लागला आहे. एवढं होऊनही चीनचा आडमुठेपणा कायम आहे. दक्षिण चिनी समुद्र असो किंवा भारताशी लागून असलेली लडाख सीमा चीन सातत्यानं विस्तारवादी धोरण राबवत आहे. तैवान, व्हिएतनाम आणि जपानशीही चीनचे सीमावाद सुरूच आहे.
चीनच्या या आक्रमक पावित्र्याला अमेरिकेनं चोख प्रत्युत्तर देण्याचं ठरवलं असून, दक्षिण चिनी समुद्रात आण्विक शस्त्रास्त्रांनी सुसज्ज असलेल्या दोन युद्धनौका पाठवल्या आहेत. तर हवाई मार्गे भारतानंही चीनची नाकाबंदी केली आहे. भारतानं लडाखच्या सीमेवर लढाऊ विमानं तैनात केली आहेत. आता भारत आणि अमेरिकेने चीनला दडपण्यासाठी दोन बाजूंनी घेरले आहे. त्यामुळे चीनची चांगलीच पंचाईत झाली आहे. चीननं गलवान खोऱ्यात घडवलेल्या रक्तपातानं भारताचा आत्मविश्वास तसूभरही डळमळीत झालेला नाही. भारतानं चीनच्या अरेला कारेनं उत्तर देण्याचीच भूमिका स्वीकारलेली आहे.
चीनवर दबाव आणणं आवश्यक असून, अमेरिकेने आपल्या दोन युद्धनौका यूएसएस रोनाल्ड रेगन आणि यूएसएस निमित्झला जपानजवळील दक्षिण चिनी समुद्रात तैनात केल्या आहेत. सोमवारी रात्रीही भारताचे लढाऊ हेलिकॉप्टर अपाचे भारत-चीन सीमेजवळ घिरट्या घालत होते. विशेष म्हणजे अपाचेबरोबरच अनेक लढाऊ विमानं सीमाभागात सातत्यानं उड्डाण करत आहेत. त्यांचं चीनच्या प्रत्येक कृतीवर बारीक लक्ष आहे. भारतीय हवाई दल चीनला लागून असलेल्या सीमेजवळ सातत्यानं युद्धसराव करत आहे. कोणत्याही प्रकारच्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी भारताची तिन्ही दलं सज्ज आहेत. केवळ अपाचेच नाही, तर चिनूक हेलिकॉप्टरनेही येथे उड्डाण केले.
याशिवाय मिग-29, सुखोई आणि जग्वार या लढाऊ विमानांनीही लेहच्या आकाशात रात्री घिरट्या घातल्या आहेत. गेल्या वर्षी 8 अपाचे लढाऊ हेलिकॉप्टर्स भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात दाखल झाले होती, त्यानंतर हवाई दल आणखी मजबूत झाले आहे. या लढाऊ हेलिकॉप्टर्सची मारक क्षमता जबरदस्त आहे. तसेच ही लढाऊ हेलिकॉप्टर्स अशा पद्धतीनं डिझाइन केली गेली आहेत, जेणेकरून रडारच्या टप्प्यात येऊ शकत नाहीत. अपाचे जवळपास २८० किमी प्रतितासाच्या वेगानं उड्डान करते. तसेच शत्रूवर 16 अँटी टँक क्षेपणास्त्र डागण्याची क्षमता ठेवतो. हे हेलिकॉप्टर सुमारे तीन तास न थांबता उड्डाण करू शकते.
चीनवर नजर ठेवण्यासाठी गलवान खोऱ्याच्या आसपासच्या हवाई तळांवर मल्टी रोल कॉम्बेट, मिराज -२०००, सुखोई-30 आणि जग्वार ही लढाऊ विमानं देखील तैनात केली गेली आहेत. हे सर्वच लढाऊ विमानं शस्त्रास्त्रांनी सज्ज असून, त्या भागाचे निरीक्षण करीत आहेत. दुसरीकडे अमेरिकन नौदलाने दक्षिण चीन समुद्रात जोरदार ताकद दाखविली आहे. अमेरिकेने आपली युद्धनौका दक्षिण चीन समुद्रात तैनात केली आहे. तसेच, बॉम्बर विमानांसह एकूण 11 लढाऊ विमानांनी दक्षिण चीन समुद्रावर उड्डाण केले.
या सर्व लढाऊ विमानांनी चीनला अमेरिकेच्या सामर्थ्याची जाणीव करून दिली आहे. अमेरिकेच्या नौदलातील सर्वात घातक युद्धनौका निमित्झ आणि रोनाल्ड रेगन या दक्षिण चिनी समुद्रात उतरल्यामुळे चीनचा पुरती नाकाबंदी करण्यात आली आहे. अमेरिकेच्या या कृतीनंतर चीन भडकला असून, अमेरिका शक्तीचं प्रदर्शन करत आहे. तसेच चीननं पुन्हा एकदा अमेरिकेला धमकी दिली आहे. अमेरिकेच्या कोणत्याही कारवाईला पीएलए चोख प्रत्युत्तर देण्यास सज्ज असल्याचंही ग्लोबल टाइम्सनं सांगितलं आहे. अमेरिकेने दक्षिण चीन समुद्रावर B-52H स्ट्रॅटोफोर्ट्रेस हेवी स्ट्रॅटेजिक बॉम्बर विमानं तैनात केले आहेत. अमेरिकेच्या दोन युद्धनौका यूएसएस निमित्झ आणि यूएसएस रोनाल्ड रेगन दक्षिण चीन समुद्रात तैनात आहेत. अमेरिकेच्या दोन्ही युद्धनौकांवर एफए-१८ ई सुपर हॉर्नेटचे दोन स्क्वॉड्रन आणि ईए-१८ जी ग्रोलर इलेक्ट्रॉनिक्स अटॅक जेट्स तैनात केले आहेत. या सर्वच युद्धनौकांच्या सुरक्षेसाठी अमेरिकेनं समुद्रात आपल्या पाणबुड्याही तैनात करून सज्ज ठेवल्या आहेत.
हेही वाचा
पोस्ट ऑफिस अन् बँकेसह सरकारी नोकऱ्यांची बंपर भरती; जाणून घ्या...
चीनच्या अडचणी वाढल्या; जिनपिंग सरकारविरोधात मुस्लिम थेट आंतरराष्ट्रीय कोर्टात
CoronaVirus: नवरी नटली; सुपारी फुटली अन् वराती मंडळींना ५० हजार दंडाची रक्कम भरावी लागली
मोठी बातमी! बँकेत अन् पोस्टात FD आहे? मग आजच जमा करा 'हे' दोन फॉर्म अन्यथा होणार मोठे नुकसान
India China FaceOff: चीनशी युद्ध झाल्यास भारतासोबत अमेरिकेची सेनाही लढणार, व्हाइट हाऊसची मोठी घोषणा
जगात टाळेबंदी; पोस्टात मिळतेय नोकरीची सुवर्णसंधी; 10वी पास असलेल्यांनी आजच अर्ज करा
चीनला घेरलं! दक्षिण चिनी समुद्रात अमेरिकेनं पाठवल्या दोन घातक विमानवाहू युद्धनौका