कोको बेटावरून चीनची पाळत, भारताला धाेका; ड्रॅगनची तिरकी चाल, धावपट्टीही बांधली

By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2023 06:48 AM2023-04-09T06:48:21+5:302023-04-09T06:48:36+5:30

पूर्व लडाखच्या मुद्द्यावरून भारत व चीनमध्ये तणाव निर्माण झालेला असतानाच आता चीनने नवी खेळी केली आहे.

China surveillance from Coco Island threat to India Dragons slant walk runway also built | कोको बेटावरून चीनची पाळत, भारताला धाेका; ड्रॅगनची तिरकी चाल, धावपट्टीही बांधली

कोको बेटावरून चीनची पाळत, भारताला धाेका; ड्रॅगनची तिरकी चाल, धावपट्टीही बांधली

googlenewsNext

नवी दिल्ली :

पूर्व लडाखच्या मुद्द्यावरून भारत व चीनमध्ये तणाव निर्माण झालेला असतानाच आता चीनने नवी खेळी केली आहे. बंगालच्या खाडीमधील अंदमान बेटांपासून अवघ्या साठ किमी अंतरावर असलेल्या म्यानमारमधील कोको बेटावरून भारतावर नजर ठेवण्यासाठी चीनने हालचाली सुरू केल्या आहेत. कोको बेटावर चीनने विमानासाठी धावपट्टी बांधली आहे. हेरगिरी करण्यासाठी तिथे चीनकडून उपकरणे बसविण्यात येत असल्याचे वृत्त आहे. चीनच्या या हालचालींवर भारताने तीव्र आक्षेप घेतला आहे. 

कोको बेटावरून चीनला भारताच्या पूर्व किनारपट्टीवर, तसेच हिंद महासागराच्या मोठ्या प्रदेशावर पाळत ठेवता येईल. याच भागात भारताचे क्षेपणास्त्र चाचणी केंद्र आहे. इथे होणाऱ्या क्षेपणास्त्र चाचण्यांची माहिती त्वरित मिळविण्यासाठी चीनकडून प्रयत्न सुरू असतात. चीनच्या वाढलेल्या हालचालींची माहिती भारताने म्यानमार सरकारला दिली आहेत. मात्र, म्यानमार सरकारने याचा इन्कार केला आहे. (वृत्तसंस्था)

लंकेमध्येही आता चीनचा रडार तळ
चीन आता श्रीलंकेतील डोंडरा बे येथील जंगलक्षेत्रात रडार तळ उभारत असल्याचे वृत्त आहे. हिंद महासागरातील भारताच्या हालचालींवर पाळत ठेवण्यासाठी या रडार यंत्रणेचा उपयोग केला जाईल. डोंडरा बे येथील रडार यंत्रणेद्वारे दक्षिण भारतातील सर्व प्रदेश, तेथील कुडनकुलम, कलपक्कम अणुऊर्जा प्रकल्प, श्रीहरिकोटा येथील स्पेस स्टेशन, अंदमान-निकोबार बेट यावर चीनला  नजर ठेवता येईल. 

‘भारत सुरक्षेसाठी पावले उचलणार’
1. कोको बेटावरील चीनच्या हालचाली पाहता भारत आपल्या सुरक्षेसाठी योग्य पावले उचलेल, असे परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी नुकतेच सांगितले होते. 
2. याबद्दल म्यानमारमधील चीनच्या राजदुताने प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. म्यानमारने चीनला कोको बेटावर हेरगिरीसाठी उपकरणे उभारण्याची १९९० साली परवानगी दिली होती. 

चीन सीमेजवळील गावाला गृहमंत्री शाह देणार भेट
- केंद्रीय गृहमंत्री अमित शाह १० आणि ११ एप्रिल रोजी अरुणाचल प्रदेशला भेट देणार असून, त्यादरम्यान ते भारत-चीन सीमेवरील किबिथू या गावात ‘व्हायब्रंट व्हिलेज प्रोग्रॅम’ची सुरुवात करतील. 
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकारने आर्थिक वर्ष २०२२-२३ ते २०२५-२६ साठी विशेषत: रस्तेजोडणीसाठी २५०० कोटी रुपयांच्या योजनेला मंजुरी दिली आहे. 
- ‘व्हायब्रंट व्हिलेज प्रोग्रॅम’अंतर्गत ४८०० कोटी रुपयांच्या योजनेला मंजुरी देण्यात आलेली आहे.ही केंद्र सरकारपुरस्कृत योजना आहे. सीमावर्ती गावांमध्ये राहणाऱ्या लोकांचे जीवनमान सुधारण्यास यामुळे मदत होणार आहे. 
-  चीनने अरुणाचलातील काही गावांचे नाव बदलण्याची कुरापत केली हाेती. त्या पार्श्वभूमीवर शाह यांची भेट महत्त्वाची मानली जाते.

Web Title: China surveillance from Coco Island threat to India Dragons slant walk runway also built

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :chinaचीन