कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी चीनने लढवली अनोखी शक्कल
By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2020 02:17 AM2020-04-04T02:17:51+5:302020-04-04T02:17:56+5:30
चीनने अँटीबॉडीज तयार करण्यास सुरुवात केली आहे, या अँटीबॉडीज कोरोना विषाणूसाठी सर्वात अचूक आणि प्रभावी उपचार असल्याचं सिद्ध होत आहेत
नवी दिल्ली : जगभरात १० लाखांहून अधिक लोकांना कोरोना व्हायरसने आपल्या जाळ्यात ओढले आहे. तर ५० हजारांहून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोना व्हायरसचा मुकाबला करण्यासाठी प्रत्येक देश आपापल्यापरीने तयारी करत आहे. कोरोना विषाणूवर लस शोधण्यासाठी जगातील संशोधक प्रयत्न करत आहेत. मात्र यातच चीनने शॉर्टकट शोधला आहे.
चीनने अँटीबॉडीज तयार करण्यास सुरुवात केली आहे, या अँटीबॉडीज कोरोना विषाणूसाठी सर्वात अचूक आणि प्रभावी उपचार असल्याचं सिद्ध होत आहेत. यामुळे चीनने हजारो रुग्णांना बरे केल्याचा दावा चीनने केला आहे. चिनी वैज्ञानिक झांग लिनकीच्या म्हणण्यानुसार कोरोना विषाणू केवळ रक्तातल्या पेशीमध्ये प्रवेश करूनच हल्ला करतो. त्याला रोखण्यासाठी चिनी शास्त्रज्ञांनी अँटीबॉडीज तयार केल्या आहेत जे विषाणूला पेशीमध्ये प्रवेश करू देत नाहीत. यामुळे व्हायरसचा शरीरात संसर्ग पसरत नाही आणि त्यावर उपचार करणे सोपे होते.
कोरोना विषाणूंविरुद्ध लढण्यासाठी चिनी शास्त्रज्ञांनी २० अँटीबॉडीजची ओळख करून दिली आहे. यातील चार अँटीबॉडी कोरोनाविरुद्ध प्रभावीपणे कार्य करत असल्याचे दिसून आले आहे. चीनच्या वुहान शहरापासून सुरू झालेला कोरोना विषाणूचा संसर्ग जगभर पसरला आहे. चीनमध्ये ८२ हजार ४३७ लोकांना या विषाणूची लागण झाली. परंतु चीन सरकारने या साथीच्या रोगातून जवळपास ७६ हजार ५६६ लोकांवर उपचार करण्यात यश मिळवले. या काळात चीनमध्ये या कोरोना विषाणूमुळे ३ हजार ३२२ लोक मरण पावले आहेत.