डोकलामध्ये चीनचे १८00 सैनिक, रस्तेबांधणीही केली; बर्फवृष्टीत भारतीय जवानही देणार पहारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2017 12:17 AM2017-12-14T00:17:04+5:302017-12-14T00:17:24+5:30
डोकलामवरून भारत व चीन यांच्यातील वाद शमल्याचे वातावरण निर्माण झाले असले तरी, आजही डोकलामध्ये चीनचे १८00 सैनिक तैनात आहेत. त्यामुळे कडाक्याच्या थंडी व बर्फवृष्टीत भारताला प्रथमच तिथे आपले सैन्य ठेवण्याची वेळ आली आहे.
नवी दिल्ली : डोकलामवरून भारत व चीन यांच्यातील वाद शमल्याचे वातावरण निर्माण झाले असले तरी, आजही डोकलामध्ये चीनचे १८00 सैनिक तैनात आहेत. त्यामुळे कडाक्याच्या थंडी व बर्फवृष्टीत भारताला प्रथमच तिथे आपले सैन्य ठेवण्याची वेळ आली आहे. एवढेच नव्हे, तर भारताने त्या भागातून आपले सैन्य कमी केल्यानंतर चीनने तिथे नवे रस्तेही बांधले आहेत.
चीनने गेल्या दोन महिन्यांत डोकलाममध्ये नवे रस्ते बांधले असल्याचे सॅटेलाइट चित्रांवरूनच उघड झाले आहे. भारताच्या बॉर्डर रोड आॅर्गनायझेशन(बीआरओ) प्रमाणे चीनची चीन रोड वर्कर्स नावाची जी संस्था आहे, तिने त्या भागांत काही रस्ते नव्याने बांधले आहेत, तर काही रस्त्यांचा विस्तार केला आहे. ज्या भागांत अडीच महिन्यांपूर्वी भारत व चीनी सैनिक जिथे एकमेकांविरोधात उभे ठाकल्याचे चित्र होते, तेथून जवळच हे रस्ते आहेत. त्यातील दोन रस्त्यांचे काम आॅक्टोबरच्या तिसºया आठवड्यात सुरू करण्यात आले होते. ते आता पूर्ण झाले आहे.
चीन व भारत या दोघांनी डोकलाममधून आपले सैन्य कमी करावे, असे दोन देशांत ठरल्याचे सांगण्यात आले होते. भारताने सैन्य माघारी घेतल्याबद्दल चीनने समाधान व्यक्त केले होते, तर चीनचे सैन्य कमी केल्यानंतर हा भारताचा विजय असल्याचे वातावरण निर्माण करण्यात आले होते.
चीनने पुढे सरकू नये यासाठी...
मात्र आजच्या घटकेला तिथे चीनने तब्बल १८00 सैनिक दिवस-रात्र उभे आहेत. सध्या त्या भागांत प्रचंड थंडी आहे आणि बर्फवृष्टीलाही सुरुवात झाली आहे. अशा वेळी भारतालाही तिथे प्रथमच आपले जवान तिथे तैनात करण्याची वेळ आली आहे. तसे न केल्यास चीनचे सैनिक डोकलामकडून आणखी पुढे सरकून भारताच्या हद्दीत येण्याची भीती आहे.