चीनची दादागिरी, भारतात घुसून रोखले कालव्याचे काम
By admin | Published: November 4, 2016 08:07 AM2016-11-04T08:07:58+5:302016-11-04T10:36:40+5:30
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव मोठया प्रमाणावर वाढलेला असताना बुधवारी लडाखमध्ये भारतीय आणि चीनी सैनिक आमने सामने आले.
Next
ऑनलाइन लोकमत
लेह दि. ४ - नियंत्रण रेषेवर भारत-पाकिस्तानमध्ये तणाव मोठया प्रमाणावर वाढलेला असताना बुधवारी लडाखमध्ये भारतीय आणि चीनी सैनिक आमने सामने आले. लडाखच्या डेमचॉक भागात ग्रामीण रोजगार योजनेतंर्गत सिंचन कालव्याचे बांधकाम सुरु होते. चीनी सैनिकांना या बांधकामाची माहिती मिळताच चीनी सैनिकांनी इथे येऊन हे बांधकाम बंद पाडले.
‘पीपल्स लिबरेशन आमी’चे ५५ जवान लडाखमध्ये घुसले व त्यांनी लवा खणण्याचे काम दादागिरी करून बंद पाडले. लष्कराचे व भारत-तिबेट सीमा पोलिसांचे ७० जवान तेथे धावून गेले आणि त्यांनी चिनी सैनिकांना माघार घेण्यास भाग पाडले. तेव्हापासून दोन्ही बाजूंचे सैनिक लक्ष ठेवून आहेत.
डेमचॉक प्रदेश लेहपासून २५० किमी अंतरावर असून तिबेटच्या सीमेजवळ हा भाग आहे. या विषयावर बोलताना भारतीय लष्कराच्या वरिष्ठ अधिका-याने चीनी सैन्याने भारतीय हद्दीत घुसखोरी केली नसल्याचे म्हटले आहे. हा नियंत्रण रेषेजवळील बांधकाम प्रकल्पाचा मुद्दा असून दोन्ही बाजूंकडून नियंत्रण रेषेजवळ चालणा-या वादग्रस्त बांधकामांवर सीमा अधिका-यांच्या बैठकीत तोडगा काढण्यात येतो असे या अधिका-याने सांगितले.
चीनच्या या आक्रमकतेला दलाई लामा यांच्या अरुणाचल दौ-याची पार्श्वभूमी आहे. भारत सरकारने नुकतीच दलाई लामा यांना अरुणाचलप्रदेशातील तवांग येथे जाण्याची परवानगी दिली आहे. दलाई लामांच्या या दौ-यावर चीनने तीव्र आक्षेप घेतला आहे. संपूर्ण अरुणाचल प्रदेश हा दक्षिण तिबेटचा भाग असल्याचा चीनचा दावा आहे.