चीनच्या घटत्या लोकसंख्येनं जगाचं टेन्शन वाढवलं, भारताला होणार मोठा फायदा!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2023 01:30 PM2023-04-20T13:30:03+5:302023-04-20T13:30:35+5:30
याच वेळी चीनची लोकसंख्या कमी होत असल्याचेही बोलले जात आहे. या बातमीने चीनसह जगातील अनेक देशांचे टेन्शन वाढवले आहे. तर भारतासाठी ही आनंदाची बातमी आहे.
काल लोकसंख्येसंदर्भातील एक अहवाल समोर आला आहे. यात भारताची लोकसंख्या 142.86 कोटीवर गेल्याचे सांगण्यात आले आहे. याच बरोबर आता भारत हा चीनला मागे टाकत जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश बनला आहे. महत्वाचे म्हणजे याच वेळी चीनची लोकसंख्या कमी होत असल्याचेही बोलले जात आहे. या बातमीने चीनसह जगातील अनेक देशांचे टेन्शन वाढवले आहे. तर भारतासाठी ही आनंदाची बातमी आहे.
भारतासाठी ही आनंदाची गोष्ट असण्याचे कारण म्हणजे, कमी खर्चाच्या मजुरांमुळे विकासाचा वेग वाढेल. यातच, चीनने या अहवालाकडे दुर्लक्ष करत आपल्याकडे अद्यापही 90 कोटीहून अधिक लोकांचे गुणवत्तापूर्ण मानव संसाधन आहे. ज्यांच्या सहाय्याने विकासाला गती मिळू शकते. यावरून घटत्या लोकसंख्येमुळे भविष्यात चीनवर होणाऱ्या परिणामांचा अंदाजही लावला जाऊ शकतो.
चीनमध्ये गेल्या काही वर्षांपूर्वी एक मूल या धोरणाचा अवलंब करण्यात आला होता. तेव्हापासून चीनची लोकसंख्या सातत्याने कमी होत आहे. चीनच्या या घटत्या लोकसंख्येचा परिणाम देशांतर्गत अर्थव्यवस्थेवर तर दिसतोच, पण जागतिक पातळीवरही याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. यामुळेच जगभरातील अर्थतज्ज्ञ चिंतित आहेत.
संयुक्त राष्ट्रांच्या लोकसंख्या दर्शकानुसार, भारताने 142.86 कोटी लोकसंख्येसह चीनला मागे टाकले असून सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश बनला आहे. चीनची लोकसंख्या 142.57 कोटी एवढी असून आता तो जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक लोकसंख्या असणारा देश बनला आहे.
यासंदर्भात बोलताना चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते वांग वेनबिन म्हणाले, लोकसंख्येच्या फायद्याचे आकलन करताना केवळ संख्याच नाही, तर त्या संख्येची गुणवत्ताही लक्षात घ्यावी लागते. लोकसंख्या तर महत्त्वाची आहेच, पण त्याच बरोबर गुणवत्ताही तेवढीच महत्वाची आहे. चीनच्या 1.4 अब्ज लोकांमध्ये काम करू शकणाऱ्या लोकांची संख्या 90 कोटी आहे.
...म्हणून चीनच्या घटत्या लोकसंख्येनं वाढवलं जगाचं टेन्शन -
चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या वक्तव्यात घटत्या लोकसंख्येसंदर्भात चिंताही जाणवत आहे. चीनमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून काम करू शकणाऱ्या लोकांची संख्या प्रचंड आहे. यामुळे जगात ड्रॅगनचा वेगाने विकास झाला. कमी खर्चात उपलब्ध होणाऱ्या मजुरांच्या बळावर उत्पादित माल जगभरात निर्यात केला जातो. मात्र आता येथील लोकसंख्या कमी होत असल्याने, चीनबाहेरील ग्राहकांसाठी खर्चात वाढ होऊ शकते. यामुळे, अमेरिकेसारख्या देशात महागाई वाढण्याची शक्यता अधिक आहे. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे, अमेरिकाही चिनमधून आयात केल्या जाणाऱ्या वस्तूंवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे.