चीनच्या हेरगिरीला लागणार चाप; आयएनएस सन्धायक नौदलात दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2024 06:46 AM2024-02-04T06:46:17+5:302024-02-04T06:46:47+5:30
आयएनएस सन्धायक भारतीय नौदलाच्या ताफ्यात दाखल
विशाखापट्टणम : समुद्रातील निगराणी करण्यासाठी आयएनएस सन्धायक हे जहाज शनिवारी आंध्र प्रदेशच्या विखाखापट्टणम् येथे आयोजित एका शानदार सोहळ्यात भारतीय नौदलामध्ये दाखल झाले. यावेळी केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, नौदल प्रमुख ॲडमिरल हरिकुमार हे यावेळी उपस्थित होते. या जहाजामुळे नौदलाचा हिंदी महासागरात दबदबा वाढणार आहे. हिंदी महासागरात हेरगिरीसाठी जहाजे पाठवणाऱ्या चीनचा यामुळे भारताने कायमचा बंदोबस्त केला आहे.
चाचेगिरी खपवून घेणार नाही : संरक्षणमंत्री
‘आयएनएस संध्याक’ हे सर्वेक्षण जहाज शनिवारी येथे संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांच्या उपस्थितीत नौदलात दाखल करण्यात आले. हे जहाज चार सर्वे व्हेसल लार्ज जहाजांमधील पहिले आहे. एसव्हीएल जहाज महासागरांबाबत माहिती मिळविण्याशिवाय देशासह इतरांचे संरक्षण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल, असे संरक्षणमंत्री राजनाथसिंह म्हणाले.
चाचेगिरी व तस्करी खपवून घेतली जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.नौदलाने येथे आयोजित केलेल्या सोहळ्यात आयएनएस संध्याकला नौदलात समाविष्ट करण्यात आले. या जहाजामुळे नौदलाची गस्तीची क्षमता वाढणार आहे.
समुद्री चाच्यांपासून जहाजांचे संरक्षण करण्यासाठी भारतीय नौदलाने दर्शवलेल्या तत्पर प्रतिसादाचा संदर्भ देत सिंह म्हणाले की, हिंद महासागरात एडनचे आखात आणि गिनीचे आखात आदी अनेक अडथळ्यांची ठिकाणे आहेत. यातील सर्वात मोठा धोका समुद्रीचाचांचा आहे. चाचेगिरी आणि तस्करीत गुंतलेले लोक खपवून घेतले जाणार नाहीत, असा इशाराही त्यांनी दिला.
आयएनएस सन्धायकची वैशिष्ट्ये
वेग
३० किमी/तास
रेंज
११,००० किमी
वजन
३,४०० टन
लांबी
२८८.१ फूट
क्षमता
१८ अधिकारी
१६० सैनिक