लद्दाखमध्ये पुन्हा चीनची घुसखोरी
By admin | Published: March 13, 2016 05:08 AM2016-03-13T05:08:52+5:302016-03-13T05:08:52+5:30
चीनच्या सैनिकांनी लद्दाख क्षेत्रात पुन्हा एकदा घुसखोरी केली. हे सैनिक सीमा ओलांडून पानगोंग तलावाजवळ भारतीय हद्दीत सुमारे ६ किमी आत घुसले होते.
लेह : चीनच्या सैनिकांनी लद्दाख क्षेत्रात पुन्हा एकदा घुसखोरी केली. हे सैनिक सीमा ओलांडून पानगोंग तलावाजवळ भारतीय हद्दीत सुमारे ६ किमी आत घुसले होते. परंतु, भारत-तिबेट सीमा पोलिसांनी (आयटीबीपी) त्यांना दोन तासांच्या आत माघारी पाठविले.
संरक्षण विभागातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना गेल्या ८ मार्चची आहे. या दिवशी पीपल्स लिबरेशन आर्र्मीचे (पीएलए) ११ सैनिक पानगोंगजवळ फिंगर-८ आणि सिरजाप-१मध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ओलांडून (एलएसी) भारतीय हद्दीत दाखल झाले होते. त्यांचे नेतृत्व कर्नल स्तरावरील एक अधिकारी करीत होता. चीनचे सैनिक चार गाड्यांमधून भारताच्या ठाकुंच सुरक्षा चौकीत आले आणि भारतात ५.५ किमी आतपर्यंत पोहोचले.
चिनी सैनिकांच्या या समूहाचा सामना गस्तीवर असलेल्या इंडो-तिबेटियन
बॉर्डर (आयटीबीपी) पोलिसांशी
झाला. त्यांनी चिनी सैनिकांना बॅनर दाखवून माघारी जाण्याचे आवाहन केले. तब्बल दोन तास चाललेल्या शाब्दिक बाचाबाचीनंतर अखेर घुसखोरी करणाऱ्या चिनी सैनिकांना परत जावे लागले. गैरसमजुतीतून अनेकदा अशा घटना घडतात असे त्यांचे म्हणणे होते. (वृत्तसंस्था)चिनी
सैनिक होते शस्त्रसज्ज
भारतीय हद्दीत घुसणारे हे चिनी सैनिक शस्त्रास्त्रांनी सज्ज होते आणि आयटीबीपीच्या जवानांजवळही शस्त्रे होती. भारत-चीन सैनिकांदरम्यान यापूर्वीही अशा घटना घडल्या आहेत. मे २०१३मध्ये भारत आणि चीनदरम्यान ३ आठवड्यांच्या संघर्षापासून
९० किमीच्या पानगोंग तलाव परिसरात तणावपूर्ण वातावरण असते.