चीनचा पुढाकार; भारत-पाक सैन्याचा प्रथमच एकत्र सराव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2018 02:26 AM2018-04-30T02:26:19+5:302018-04-30T02:26:19+5:30
भारत आणि पाकिस्तानचे संबंध दहशतवादाच्या मुद्द्यावरून कमालीचे ताणलेले असतानाच या दोन्ही देशांचे सैन्य प्रथमच दहशतवादविरोधी कारवाईच्या बहुराष्ट्रीय सरावात एकत्रितपणे सहभागी होणार आहे
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानचे संबंध दहशतवादाच्या मुद्द्यावरून कमालीचे ताणलेले असतानाच या दोन्ही देशांचे सैन्य प्रथमच दहशतवादविरोधी कारवाईच्या बहुराष्ट्रीय सरावात एकत्रितपणे सहभागी होणार आहे. स्वातंत्र्यानंतर भारत व पाकिस्तानमध्ये तीन युद्धे झाली असली तरी दोन्ही देशांच्या सैन्यदलांनी एकत्रित लष्करी सराव करण्याची ही पहिलीच वेळ असेल. ‘पीस इनिशिएटिव्ह’ नावाचा हा दहशतवादविरोधी सराव येत्या सप्टेंबरमध्ये रशियाच्या उराल पर्वतराजींमध्ये आयोजित करण्यात येणार आहे.
पाश्चात्य देशांच्या ‘नाटो’ या लष्करी संघटनेस शह देण्यासाठी चीनच्या पुढाकाराने स्थापन झालेल्या ‘शांघाय सहकार्य संघटने’च्या (एससीओ) वतीने या सरावाचे आयोजन करण्यात आले असून त्यात या संघटनेचे चीनसह सर्व आठही देश सहभागी होतील. संरक्षणमंत्री निर्मला सितारामन गेल्या आठवड्यात ‘एससीओ’ देशांच्या संरक्षणमंत्र्यांच्या बैठकीसाठी बीजिंगला गेल्या तेव्हा त्यांनी या बहुराष्ट्रीय सरावातील भारताच्या सहभागास पुष्टी दिली, असे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.
एससीओचे गेल्या वर्षी पूर्ण सदस्य : सन २००१ मध्ये स्थापन झालेल्या ‘एससीओ’मध्ये सन २००५ मध्ये भारत व पाकिस्तानला प्रथम निरीक्षक म्हणून व गेल्या वर्षी पूर्ण सदस्य म्हणून दाखल करून घेण्यात आले. भारताला सदस्य करून घेण्यासाठी रशियाने आग्रही भूमिका घेतली तर चीनने पाकिस्तानच्या सदस्यत्वासाठी पुढाकार घेतला होता.
शांतता सेनेत एकत्रित काम यापूर्वी संयुक्त राष्ट्र संघाच्या शांतता सेनेच्या कामात भारत व पाकिस्तानच्या सैन्याने एकत्रित सहभाग घेतलेला आहे.
भारत व चीन यांच्या सैन्याचे संयुक्त लष्करी सराव अधूनमधून होत असतात. गेल्या वर्षी डोकलामवरून दोन्ही देशांमध्ये ७६ दिवस तिढा निर्माण झाल्याने असा द्विपक्षीय सराव झाला नव्हता. आता ‘एससीओ’च्या बहुराष्ट्रीय सरावाच्या निमित्ताने असे द्विपक्षीय सराव पुन्हा सुरु होतील, अशी आशा आहे.