चीनचे सैन्य पूर्ण माघारी हटले पाहिजे, भारताने ठणकावले; संरक्षण मंत्री आज लडाखला भेट देणार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2020 05:51 AM2020-07-17T05:51:25+5:302020-07-17T06:33:36+5:30
भारत व चीन यांच्यात चौथ्या टप्प्यातील गुरुवारची चर्चा पार पडल्यानंतर भारताचे हे वक्तव्य आले आहे.
नवी दिल्ली : एलएसीवरून चीनचे सैन्य पूर्णपणे माघारी हटले पाहिजे, असे भारताने पुन्हा एकदा ठणकावले आहे. दरम्यान, पूर्व लडाखमध्ये सैन्य मागे हटविण्याची प्रक्रिया जटिल आहे व सतत त्याची सत्यासत्यता पटवण्याची गरज आहे, असे भारतीय लष्कराने म्हटले आहे. भारत व चीन यांच्यात चौथ्या टप्प्यातील गुरुवारची चर्चा पार पडल्यानंतर भारताचे हे वक्तव्य आले आहे.
लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, भारत व चीन लष्कराच्या वरिष्ठ कमांडरनी पूर्व लडाखमध्ये सैनिक मागे हटविण्याच्या पहिल्या टप्प्यातील क्रियान्वयनाच्या प्रगतीचा आढावा घेतला व या भागातून सैनिक पूर्णपणे मागे घेण्याच्या पुढील उपायांवर चर्चा केली.
कोर कमांडरमध्ये चौथ्या टप्प्यातील चर्चा वास्तविक नियंत्रण रेषेवर (एलएसी) भारतीय सीमेत चुशुलमध्ये एका नियोजित ठिकाणी मंगळवारी सकाळी ११ वाजता सुरू झाली होती. ती बुधवारी रात्री उशिरा २ वाजेपर्यंत चालली.
लष्कराचे प्रवक्ते कर्नल अमन आनंद यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, सैन्य मागे घेण्यावर दोन्ही बाजूंनी वचनबद्धता व्यक्त केली. ही प्रक्रिया जटिल व निरंतर सत्यासत्यता पटविण्याची गरज आहे. राजनैतिक व सैन्य स्तरावर नियमित रूपाने बैठकांद्वारे ही प्रक्रिया पुढे नेली जात आहे.
सैन्य मागे घेण्याची औपचारिक प्रक्रिया ६ जुलै रोजी सुरू झाली होती. त्यापूर्वी एक दिवस आधी राष्टÑीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल व चिनी विदेशमंत्री वांग यी यांच्यात सुमारे दोन तास दूरध्वनीवरून चर्चा झाली होती.
राजनाथ सिंह आज लडाखला भेट देणार
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे शुक्रवारी लडाखला भेट देणार आहेत. एकूणच परिस्थितीची समीक्षा करणे आणि सैन्य तयारीची पाहणी करण्यासाठी त्यांचा हा दौरा असणार आहे. चीन आणि भारताने टप्प्याटप्प्याने सैन्य मागे घेण्याचे ठरविल्यानंतर राजनाथ सिंह यांचा हा दौरा होत आहे.
यावेळी सैन्य दलाचे प्रमुख जनरल एम. एम. नरवणे हे सोबत असतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ३ जुलै रोजी लडाखला अचानक भेट दिली होती. यावेळी त्यांनी सैनिकांशी संवाद साधला होता. आजच्या दौऱ्यात राजनाथ सिंह हे जनरल नरवणे, कमांडर ले. जनरल योगेश कुमार जोशी, ले. जनरल हरिंदर सिंग आणि अन्य सैन्य अधिकाऱ्यांशी संवाद साधतील.
गलवान खोºयात झालेल्या संघर्षानंतर भारताचे २० जवान शहीद झाले होते. या संघर्षात चीनच्या सैन्याचेही मोठे नुकसान झाले. तथापि, तणाव कमी करण्यासाठी भारत आणि चीन यांच्यात सातत्याने चर्चा सुरू आहे. आता या भागातील सैन्य मागे जात आहे.