चीनच्या हालचाली चिंताजनक नाहीत, भारतीय लष्कराचा दावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2018 12:33 AM2018-07-30T00:33:32+5:302018-07-30T00:33:54+5:30
अमेरिकी काँग्रेसच्या सदस्या अॅन वॅग्नर यांनी संसदीय समितीपुढील सुनावणीत डोकलाममध्ये चिनी सैन्याने पुन्हा मोर्चेबांधणी सुरु केल्याचे विधान केले होते. त्या पार्श्वभूमीवर भारतीय लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने हा खुलासा केला.
नवी दिल्ली : गेल्या वर्षी सलग ७३ दिवस तणावपूर्ण तिढा निर्माण झालेल्या डोकलाम पठारावर गेले काही दिवस चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीच्या (पीएलए) सैनिकांच्या हालचाली वाढल्या असल्या तरी त्या आगामी थंडीपूर्वी रसद साठविणे व नव्या तुकड्या दाखल होणे या नित्याच्या बाबींशी संबंधित असून त्यात चिंता करण्यासारखे काही नाही, असा खुलासा भारतीय लष्करातील वरिष्ठ सूत्रांनी केला.
अमेरिकी काँग्रेसच्या सदस्या अॅन वॅग्नर यांनी संसदीय समितीपुढील सुनावणीत डोकलाममध्ये चिनी सैन्याने पुन्हा मोर्चेबांधणी सुरु केल्याचे विधान केले होते. त्या पार्श्वभूमीवर भारतीय लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने हा खुलासा केला. चिनी सैन्याच्या हालचालींवर आमचे नेहमीप्रमाणे निरंतर लक्ष आहे. त्यांनी ठाणे बळकट करण्यासाठी किंवा आक्रमक व्यूहरचनेसाठी काही नवे केल्याचे आम्हाला आढळलेले नाही.
भारत, चीन व भूतानच्या सीमा जेथे एकत्र मिळतात त्या तिठ्याजवळून वाहणारा तोरसा नाला १०० चौ. किमी क्षेत्रफळाच्या डोकलामचे विभाजन करतो. तो नाला ओलांडण्याच्या पीएलएचे सैनिक तयारी करीत आहेत, असे दिसत नाही. आगामी काही दिवसांत त्या भागात कडाक्याची थंडी सुरु होईल. त्यासाठी नव्या दमाच्या सैनिकांच्या तुकड्या तैनात करणे तसेच जीवनावश्यक वस्तू व लष्करी साहित्याची पुरेशी रसद भरून ठेवणे ही नित्याची कामे आहेत.
क्षेपणास्त्रे त्यांच्या भूमीत
डोकलाम भागात पीएलएचे ७०० सैनिक नेहमी असतात. त्यांच्यासाठी प्री-फॅब बराकी आहेत. चीनची क्षेपणास्त्रे सीमेपासून बरीच आत त्यांच्या भूमीवर आहेत, असेही हा अधिकारी म्हणाला