'चीनच्या आकड्यांची गॅरंटी नाही, तर भारतातील कोरोनाचे आकडे ओपन'
By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2020 07:35 PM2020-06-05T19:35:22+5:302020-06-05T19:52:12+5:30
वुहानमधील तब्बल एक कोटी लोकांची चाचणी केल्यानंतर आता शहरात कोरोनाचा एकही नवा रुग्ण सापडलेला नाही. चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाने दिलेल्या माहितीनुसार बाहेरून आलेल्या पाच जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे.
मुंबई - जगभरात कोरोना विषाणूच्या संसर्गाचे केंद्र बनलेले चीनमधील वुहान शहर आता जवळपास कोरोनामुक्त झाल्याचे वृत्त आहे. चीनमध्ये कोरोनाच्या संसर्ग झालेल्या शेवटच्या तीन रुग्णांनीही कोरोनावर मात केली असून, आता त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. वुहानमधून जगभरात पसरलेल्या कोरोनाच्या आकड्यांवर भाजपाध्यक्ष जेपी नड्डा यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. चीनमध्ये कम्युनिष्टांचं सरकार असल्याने तेथील आकड्यांची गॅरंटी नसल्याचं नड्डा यांनी म्हटलं आहे.
वुहानमधील तब्बल एक कोटी लोकांची चाचणी केल्यानंतर आता शहरात कोरोनाचा एकही नवा रुग्ण सापडलेला नाही. चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाने दिलेल्या माहितीनुसार बाहेरून आलेल्या पाच जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. यामधील चार जण हे शांघाईमधील आहेत. तर एक जण हा सिचुआन प्रांतामधील आहे. तसेच गुरुवारी लक्षणे दिसत नसलेले तीन रुग्ण सापडले आहेत. त्यानंतर अशा प्रकारच्या रुग्णांची संख्या २९७ झाली आहे. या सर्व रुग्णांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. गुरुवारपर्यंतच्या आकडेवारीनुसार चीनमध्ये कोरोनाचा संसर्ग झालेल्यांचा एकूण आकडा ८३ हजार ०२७ एवढा झाला असून, त्यापैकी ६६ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. तर ७८ हजार ३२७ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. चीनमध्ये आतापर्यंत कोरोनामुळे ४ हजार ६३४ जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र, चीनमधील रुग्णांच्या आकडेवारीवरुन भाजपाध्य जेपी नड्डा यांनी नो गॅरंटी असं म्हटलं आहे.
चीन कम्युनिस्ट देश है। वहां कम्युनिस्ट पार्टी के अध्यक्ष से प्रश्न नहीं पूछ सकते। वो जो आंकड़े दे रहे हैं, उसकी क्या गारंटी है कि वो सही हैं?
— BJP (@BJP4India) June 5, 2020
हमारे देश में आंकड़े ओपन हैं। यहां कोई चीज छुपी नहीं रहती है।
ऐसे में चीन और भारत की तुलना सही नहीं है: श्री @JPNadda#JPNaddaOnZeeNewspic.twitter.com/kFgAnRRVeS
चीन हा कम्युनिष्ट देश असून तेथे कम्युनिष्ट पक्षाच्या अध्यक्षांना कुणीही प्रश्न विचारू शकत नाही. त्यामुळे, चीनकडून येणाऱ्या आकड्यांची काय गॅरंटी, ते खरे असतीलचं असं नाही? असे जेपी नड्डा यांनी म्हटलं आहे. मात्र, भारतातील कोरोना रुग्णांची संख्या ओपन आहे, येथे काहीही लपून राहत नाही. त्यामुळे चीन आणि भारताची तुलना योग्य नाही, असेही नड्डा यांनी म्हटले आहे. दरम्यान, भारतातील कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकाड २ लाखांच्यावर पोहोचला असून त्यापैकी १ लाख ९ हजार रुग्ण बरे झाले आहेत.