चीनची नकारघंटा ! भारताच्या NSG सदस्यत्वासाठीच्या भूमिकेत बदल नाही
By admin | Published: November 7, 2016 07:10 PM2016-11-07T19:10:54+5:302016-11-07T19:10:54+5:30
अणुपुरवठादार देशांच्या संघटनेचे (एनएसजी) सदस्यत्व मिळवण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या भारताबाबतच्या आपल्या भूमिकेत बदल करण्यास चीनने नकार दिला आहे
Next
>ऑनलाइन लोकमत
बीजिंग, दि. 7 - अणुपुरवठादार देशांच्या संघटनेचे (एनएसजी) सदस्यत्व मिळवण्यासाठीच्या भारताच्या प्रयत्नांमध्ये चीनने पुन्हा एकदा खोडा घातला आहे. एनएसजी सदस्यत्वासाठी प्रयत्नशील असलेल्या भारताबाबतच्या आपल्या भूमिकेत बदल करण्यास चीनने नकार दिला आहे. त्यामुळे शुक्रवारी होणाऱ्या एनएसजीच्या बैठकीपूर्वी भारताच्या प्रयत्नांना धक्का बसला आहे.
शुक्रवारी व्हिएन्ना येथे एनएसजीच्या सदस्य देशांची महत्तपूर्ण बैठक होणार आहे. या बैठकीच्या पार्श्वभूमीवर चीनने सांगितले की, एनएसजीचे सदस्यत्व हवे असल्यास भारताने परमाणू अप्रसार करार (एनपीटी) वर सही करावी किंवा एनपीटी सदस्यत्व नसलेल्या देशांबाबत एलिट सदस्यांमध्ये एकमत होईपर्यंत सदस्यत्वासाठी वाट पाहावी, असे चीनने सांगितले. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते लू कँग म्हणाले, "भारताच्या एनएसजी सदस्यत्वाबाबतच्या आमच्या भूमिकेत कोणताही बदल झालेला नाही."
गेल्याच आठवड्यात भारतीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि त्यांचे समकक्ष चीनचे यँग जेईची यांच्यात हैदराबाद येथे झालेल्या बैठकीत डोवाल यांनी भारताच्या एनएसजी सदस्यत्वाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यावेळी चीनने भारताच्या एनएसजी सदस्यत्वासाठी आपण सकारात्मक असल्याचे संकेत दिले होते.