चीनच्या मंदीचा भारतीय शेअर बाजाराला फटका, सेन्सेक्स २५ हजारच्या खाली
By admin | Published: January 7, 2016 01:59 PM2016-01-07T13:59:06+5:302016-01-07T14:29:17+5:30
चीनच्या शेअर बाजारातील अर्थमंदीचे परिणाम भारतीय शेअरबाजारावर होत आहे. गुरुवारी सकाळी चीनच्या शेअर बाजारात ७ टक्के घसरण झाली.
Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ७ - चीनच्या शेअर बाजारातील मंदीचा विपरीत परिणाम भारतीय शेअरबाजारावर होत आहे. गुरुवारी सकाळी चीनच्या शेअर बाजारात ८ टक्के घसरण झाली. त्याचे परिणाम भारतीय शेअर बाजारात दिसून आले. मुंबई शेअर बाजारात ५०० अंकांची घसरण होऊन सेन्सेक्स २५ हजारांच्या खाली आला.
राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा निर्देशांकसुध्दा ७६०० च्या खाली आला. चीनचे चलन युआनमध्येही घसरण झाली आहे. या घसरणीमुळे चीनच्या शेअर बाजारात अधिक पडझड रोखण्यासाठी वेळेआधीच व्यवहार थांबवण्यात आले. आठवडयाभरात दुस-यांदा चीनवर शेअर बाजार नियोजित वेळेआधीच बंद करण्याची वेळ ओढवली आहे.
नव्यावर्षाच्या पहिल्या दिवसापासून मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये १००० अंकांची घसरण झाली आहे. जगातील दुस-या क्रमांकाची अर्थव्यवस्था असलेल्या चीनचा मंदीच्या दिशेने सुरु झालेल्या प्रवासाचा भारतीय शेअर बाजाराला फटका बसत असून, भारतीय अर्थव्यवस्थेवरही त्याचे पडसाद दिसू शकतात.
भारतीय शेअर बाजार घसरण्याची मुख्य कारणे:
- चिनी चलन युआनमध्ये सातत्याने होत असलेली घसरण.
- पीपल्स बँक ऑफ चायनाने युआनचा रेफरन्स रेट एप्रिल २०११ च्या पातळीवर नेऊन ठेवला. थोडक्यात युआनचा हा पावणे पाच वर्षांतला नीचांक आहे.
- हाँगकाँगच्या फ्री ट्रेडिंग मार्केटमध्येही युआन १.३ टक्क्यांनी घसरला.
- चिनी शेअर बाजाराचे कामकाज बंद ठेवण्यात आले, तीन दिवसात ही वेळ दुस-यांदा आली.
- जागतिक बँकेने जगाची अर्थव्यवस्था कूर्मगतीने वाढेल असे भाकित केले. आधी वाढीचा अंदाज २०१६मध्ये ३.३ टक्के होता, जो जागतिक बँकेने कमी करून २.९ टक्के इतका कमी केला.
- चीनच्या घटत्या मागणीमुळे खनिज तेलाटे भाव आणखी गडगडले. खनिज तेलाच्या भावांनी ११ वर्षांतला नीचांक, ३५ डॉलर्स प्रति बॅरल इतका गाठला आहे.