कोलकात्यात चायनाटाऊनचा व्यवसाय निम्म्यावर
By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2020 06:02 AM2020-02-20T06:02:42+5:302020-02-20T06:03:11+5:30
कोरोनामुळे खवय्ये धास्तावले; चायनीज हॉटेलमध्ये पाय ठेवण्यास नकार
कोलकाता : सुक्याबरोबर ओलेही जळते, असा प्रकार कोरोनाच्या साथीमुळे काही ठिकाणी झाला आहे. चीन व जगातील काही देशांमध्ये फैलाव झालेल्या या साथीचा कोलकातातील खवय्यांनीही धसका घेतला. देशातील सर्वात मोठे चायनाटाऊन कोलकात्यापाशी तांगरा येथे असून, तेथील चायनीज हॉटेलमध्ये जाण्यासाठी लोक आता घाबरत आहेत. त्यामुळे तेथील चिनी लोकांचा व्यवसाय गेल्या काही दिवसांत ५० ते ६० टक्क्यांनी कमी झाला आहे.
तांगरा येथे बनविले जाणारे चिनी पदार्थ साऱ्या देशातील खवय्यांच्या याआधीच पसंतीस उतरले आहेत. या भागात अजून एकही कोरोनाग्रस्त रुग्ण आढळलेला नाही. कोरोनाने जिथे तांडव मांडले आहे, ते चीनमधील वुहान शहर तांगरापासून २७०० कि.मी. दूर आहे. तांगराच्या चायनाटाऊनचा वुहानसह चीनशी काहीही संबंध उरलेला नाही.
अनेक दशकांपासून या भागात वास्तव्य करून असलेल्या चिनी लोकांच्या मालकीची तिथे सुमारे ४० पेक्षा जास्त छोटी-मोठी हॉटेल आहेत. तिथे किमान २५०० चिनी लोक राहतात तर कोलकातातील तिरेटा बाजार येथे सुमारे २ हजार चिनी लोक राहतात. कोलकातातील चिनी आता भारतीय नागरिक आहेत. या चिनी लोकांच्या युवा पिढीत अनेकजण कॅनडा, आॅस्ट्रेलिया, स्वीडन, अमेरिका आदी देशांत स्थायिक झाले आहेत. चीनमधील खाद्यपदार्थांतूनच कोरोनाची लागण झाल्याचा संशय असल्याने तांगरा येथील चिनी लोकांच्या खाद्यपदार्थांकडे लोक सध्या फारसे फिरकत नाहीत. त्यामुळे गेल्या आठवड्याच्या अखेरीस तांगरामध्ये काही हॉटेलांमध्ये तर शुकशुकाट होता.
काही लाख रुपयांचा तोटा
तांगरा येथे शून ली हे छोटेसे हॉटेल चालविणाºया मॅथ्यू चेन या चिनी व्यक्तीने सांगितले की, आमच्या हॉटेलमध्ये १ फेब्रुवारीला ८१ ग्राहक आले होते. त्यानंतर ८ फेब्रुवारीला ही संख्या ४३ पर्यंत खाली घसरली. त्यामुळे व्यवसायामध्ये एका दिवसात आम्हाला १७ हजार रुपयांचा तोटा सहन करावा लागला. तेथील बिग बॉस, किम लिंग या मोठ्या हॉटेलांमध्ये गेल्या शनिवारी एक हजारपेक्षा ग्राहक आले होते. मात्र ते इतर वेळेपेक्षा संख्येने कमीच होते. या हॉटेलना सुमारे ४ लाख रुपयांचा तोटा सहन करावा लागला.