चीनी हेलिकॉप्टरची चार वेळा घुसखोरी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2018 06:04 AM2018-03-27T06:04:15+5:302018-03-27T06:04:15+5:30

चीनमधील सैन्याच्या हेलिकॉप्टर्सनी गेल्या महिनाभरात चार वेळा प्रत्यक्ष नियंत्रण रेषेचे (एलएसी) उल्लंघन केल्याचे आढळून आले आहे

Chinese chopper four times infiltration! | चीनी हेलिकॉप्टरची चार वेळा घुसखोरी!

चीनी हेलिकॉप्टरची चार वेळा घुसखोरी!

Next

नवी दिल्ली : चीनमधील सैन्याच्या हेलिकॉप्टर्सनी गेल्या महिनाभरात चार वेळा प्रत्यक्ष नियंत्रण रेषेचे (एलएसी) उल्लंघन केल्याचे आढळून आले आहे. १० मार्च रोजी उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्याच्या बरहोटी क्षेत्रात चीनच्या हेलिकॉप्टर्सनी भारतीय हवाई क्षेत्रात ४ किलोमीटरपर्यंत घुसखोरी केली होती.
गुप्तचर विभागाच्या अहवालातही तीन अन्य उल्लंघनांचा उल्लेख करण्यात आला आहे. या अहवालानुसार, ८ मार्च रोजी सकाळी ८.५५ वाजता चीनच्या सैन्याची दोन हेलिकॉप्टर्स नियंत्रण रेषेचे उल्लंघन करून, भारतीय हवाई क्षेत्रात लडाखमध्ये ट्रिग हाइट रिजनमध्ये आली होती. त्या वेळी या हेलिकॉप्टर्सनी भारतीय हवाई क्षेत्रात १८ किलोमीटर आतपर्यंत घुसखोरी केली. त्या आधी २७ फेब्रुवारी रोजी चीनची दोन हेलिकॉप्टर्स भारतीय हवाई क्षेत्रात १९ किलोमीटर आत लडाखच्या ट्रिग हाइट आणि डेपसांग व्हॅलीपर्यंत आत आले होते. या घटनांना केंद्र सरकारने दुजोरा मात्र दिलेला नाही.

परिस्थिती हाताळण्यास तयार - सीतारामन
डेहराडून : सैन्य दलाचे आधुनिकीकरण करण्यात येत आहे, असे सांगतानाच डोकलाममधील परिस्थिती हाताळण्यास सरकार तयार आहे, असे स्पष्टीकरण संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिले. त्या म्हणाल्या की, भारतीय सैन्याच्या तयारीत कोणतीही कमतरता नाही.
कोणत्याही आव्हानाचा सामना करण्यासाठी भारतील लष्कर तयार आहे. सैैन्य, नौदल आणि हवाई दलाच्या आधुनिकीकरणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून पुढाकार घेण्यात येत आहे. भारताच्या संरक्षणात उत्तराखंडचे मोठे योगदान आहे. प्रत्यक्ष लष्करप्रमुख जनरल रावत हेही उत्तराखंडचेच आहेत.

भारताने धडा घ्यायला हवा
गेल्या वर्षी घडलेल्या डोकलाम प्रकरणातून भारताने धडा घ्यायला हवा होता, अशी प्रतिक्रिया चीनने दिली आहे. डोकलाम हा भाग चीनचाच आहे आणि त्याला ऐतिहासिक संदर्भही आहेत, असा दावा चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते हुआ चुनिंग यांनी केला.

Web Title: Chinese chopper four times infiltration!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.