भारतीय रेल्वेकडून चिनी कंपनीला कंत्राट; दिल्ली-मेरठ कॉरिडॉरमधील भूयारी मार्ग बांधणार
By देवेश फडके | Published: January 4, 2021 01:00 PM2021-01-04T13:00:19+5:302021-01-04T13:04:05+5:30
दिल्ली ते मेरठ या मार्गादरम्यानच्या रॅपिड रेल ट्रान्झिट सिस्टीम अंतर्गत येणाऱ्या भूयारी मार्गाचे काम चिनी कंपनीला देण्यात आले असून, NCRTC कडून हे कंत्राट देण्यात आले आहे.
नवी दिल्ली :दिल्ली ते मेरठ या मार्गादरम्यान तयार करण्यात येणाऱ्या रॅपिड रेल ट्रान्झिट सिस्टीम अंतर्गत येणाऱ्या भूयारी मार्गाचे काम चिनी कंपनीला देण्यात आल्याचे समोर आले आहे. राष्ट्रीय राजधानी क्षेत्र परिवहन महामंडळाकडून (NCRTC) शांघाई टनल इंजिनिअरिंग कंपनीला हे कंत्राट देण्यात आले आहे.
राष्ट्रीय राजधानी क्षेत्र परिवहन महामंडळाकडून देशात प्रथमच रॅपिड रेल ट्रान्झिट सिस्टीम उभारण्याचे काम सुरू आहे. भारत-चीन सीमावादावरून निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर चिनी कंपनीला देण्यात आलेले कंत्राट रोखण्यात आले होते. आता मात्र पुन्हा एकदा शांघाई टनल इंजिनिअरिंग कंपनीच्या कंत्राटाला मान्यता देण्यात आली आहे. दिल्ली-मेरठ कॉरिडॉर अंतर्गत तयार करण्यात येणाऱ्या रॅपिड रेल ट्रान्झिट सिस्टीममध्ये दिल्लीतील न्यू अशोक नगर ते गाझियाबाद येथील साहिबाबाद दरम्यान जमिनीखालून जाणारा ५.६ किमीचा मार्ग चिनी कंपनी तयार करणार आहे.
राष्ट्रीय राजधानी क्षेत्र परिवहन महामंडळाच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, कंत्राट देण्यासाठी वेगवेगळ्या स्तरावरून परवानगी घेण्यात आली आहे. तसेच कंत्राट देताना सर्व नियमांचे आणि प्रक्रियांचे पालन करण्यात आले आहे. एकूण ८२ किमी अंतराच्या दिल्ली-गाजियाबाद-मेरठ कॉरिडोअरसंबंधी सर्व नागरी कामांचे कंत्राट देण्यात आले असून, दिलेल्या मुदतीत काम पूर्ण होईल अशा वेगाने बांधकाम सुरू आहे, असे त्यांनी सांगितले.
दिल्ली-मेरठ दरम्यान सेमी हायस्पीड प्रकल्प तयार करण्यात येत आहे. एकूण ८२.१५ किमी लांबीच्या प्रकल्पापैकी ६८.०३ किमी उन्नत मार्ग, तर १४.१२ किमीचा भूयारी मार्ग असेल. या भूयारी मार्गापैकी ५.६ किमी मार्गासाठी शांघाई टनल इंजिनिअरिंग कंपनीची बोली सर्वात कमी होती. लडाखमधील सैन्य संघर्षामुळे भारत आणि चीनमध्ये तणाव असतानाच हे कंत्राट चिनी कंपनीला देण्यावरून वाद निर्माण झाला होता.
जून २०२० मध्ये काढण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेत शांघाई टनल इंजिनिअरिंग कंपनीने १ हजार १२६ कोटी रुपयांची बोली लावली होती. तर भारतीय कंपनी असलेल्या 'एल अँड टी'ने १ हजार १७० कोटी रुपयांची आणि टाटा प्रोजेक्ट व एसकेईसी के. जेव्ही या कंपन्यांनी १ हजार ३४६ कोटी रुपयांची बोली लावली होती.