राष्ट्रपती, पंतप्रधानांसह देशातील दहा हजार व्यक्तींवर चिनी कंपनीची पाळत

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2020 01:13 AM2020-09-15T01:13:00+5:302020-09-15T06:41:23+5:30

भारतातर्फे याबाबत कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आलेली नाही. मात्र, सरकार या प्रकारची शहानिशा व चौकशी करीत आहे, असे समजते.

The Chinese company monitors tens of thousands of people in the country, including the President and the Prime Minister | राष्ट्रपती, पंतप्रधानांसह देशातील दहा हजार व्यक्तींवर चिनी कंपनीची पाळत

राष्ट्रपती, पंतप्रधानांसह देशातील दहा हजार व्यक्तींवर चिनी कंपनीची पाळत

googlenewsNext

नवी दिल्ली : राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी केंद्रीय मंत्री शरद पवार, त्यांच्या कन्या व खासदार सुप्रिया सुळे, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह देशातील सुमारे दहा हजार अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या हालचालींवर चीनमधील झेनुआ ही कंपनी पाळत ठेवून असल्याची धक्कादायक बाब उजेडात आली आहे.
भारतातर्फे याबाबत कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आलेली नाही. मात्र, सरकार या प्रकारची शहानिशा व चौकशी करीत आहे, असे समजते. चीनच्या एप्समार्फतही असे प्रकार होत असल्याचे आढळून आल्याने त्यावर भारताने बंदी घातली आहे. पार्श्वभूमीवर देशाची सायबर सुरक्षा अधिक मजबूत करावी, अशी मागणी काँग्रेसने केंद्र सरकारकडे केली. या कंपनीने ब्रिटन, आॅस्ट्रेलियातील महत्त्वाच्या व्यक्तींवरही पाळत ठेवली असल्याचे वृत्त इंग्रजी दैनिकाने प्रकाशित केले आहे. चीनच्या भारतातील राजदूताने मात्र याचा इन्कार केला आहे.
पूर्व लडाखमध्ये चिनी सैनिकांशी झालेल्या संघर्षात भारताचे २० जवान शहीद झाले होते. त्यानंतर दोन्ही देशांत तणाव वाढला असून झेनुआच्या हेरगिरीच्या घटनेने भारतात खळबळ माजली आहे. पाच पंतप्रधान, २४ मुख्यमंत्री, सरन्यायाधीश, सर्व पक्षांचे ३५० खासदार, महापौर, राज्यांचे मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते, पत्रकार यांच्यासह दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी, पी. व्ही. नरसिंहराव, अटलबिहारी वाजपेयी यांच्या नातेवाईकांवर तर माजी पंतप्रधान मनमोहनसिंग, एच. डी. देवेगौडा यांच्यावर व त्यांच्या नातेवाईकांवर झेनुआने पाळत ठेवली होती वा आहे.

यांच्यावरही ठेवले लक्ष
राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उद्योगपती रतन टाटा, अणुशास्त्रज्ञ अनिल काकोडकर, काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी तसेच त्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्य, पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदरसिंग, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, ओदिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान, केंद्रीय मंत्री राजनाथसिंह, रविशंकर प्रसाद, निर्मली सीतारामन, स्मृती इराणी, पीयूष गोयल, चीफ आॅफ डिफेन्स स्टाफ बिपीन रावत, माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, चित्रपट दिग्दर्शक श्याम बेनेगल यांच्या हालचालींवरही या कंपनीचे लक्ष होते.
याशिवाय द हिंदू समूहाचे अध्यक्ष एन. रवी, इंडिया टुडे समूहाचे सल्लागार संपादक राजदीप सरदेसाई, झी न्यूजचे मुख्य संपादक सुधीर चौधरी, पंतप्रधान कार्यालयातील माजी माध्यम सल्लागार संजय बारू, इंडियन एक्स्प्रेसचे मुख्य संपादक राजकमल झा यांच्यावरही चिनी कंपनीने पाळत ठेवली, असे वृत्तात म्हटले आहे.

अशी ठेवण्यात येते पाळत
चीनचे सरकार व कम्युनिस्ट पक्ष यांच्याशी झेनुआ कंपनी संबंधित असून तिचे प्रमुख कार्यालय शेन्झेन शहरामध्ये आहे. भारतातील राजकीय नेत्यांवरच नाही तर उद्योगक्षेत्रातील अग्रगण्य व्यक्ती, न्याययंत्रणा, माध्यमे आदी क्षेत्रांतील व्यक्तींच्या हालचालींवर झेनुआ कंपनी पाळत ठेवण्याचे काम करते.
या व्यक्तींच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून त्यांची सर्व वैयक्तिक माहिती जमा करण्यात येते. इतकेच नव्हे तर त्या व्यक्तींचे मित्र, अनुयायी कोण आहेत, याचाही तपशील ही कंपनी गोळा करते. ही व्यक्ती कुठे कुठे जाते, त्याचा मागोवाही आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने घेतला जातो.
या अतिमहत्त्वाच्या व्यक्तींची सर्व खासगी व सार्वजनिक क्षेत्रातील माहिती गोळा करून तिचे विश्लेषण केले जाते. त्यातून त्या व्यक्तींविषयी चीन सरकार आडाखे बांधून भूमिका घेते, अशीही चर्चा आहे.

Web Title: The Chinese company monitors tens of thousands of people in the country, including the President and the Prime Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.