चीनचे संरक्षण मंत्री भारतात येणार, राजनाथ सिंह यांची भेट घेणार: गलवान घटनेनंतर पहिली भेट
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2023 21:16 IST2023-04-25T21:15:46+5:302023-04-25T21:16:25+5:30
LAC वर सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर चीनचे संरक्षण मंत्री भारत दौऱ्यावर येत आहेत.

चीनचे संरक्षण मंत्री भारतात येणार, राजनाथ सिंह यांची भेट घेणार: गलवान घटनेनंतर पहिली भेट
नवी दिल्ली : LAC वर सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर चीनचे संरक्षण मंत्री भारत दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा हा दौरा शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) बैठकीच्या संदर्भात होत आहे. या बैठकीला उपस्थित राहण्यासाठीच ते भारतात येत आहेत. यादरम्यान ते 27 एप्रिलला भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचीही भेट घेणार आहेत.
चीनने एक निवेदन जारी केले
चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांचे निकटवर्तीय मानले जाणारे जनरल ली यांचा भारत दौरा महत्त्वाचा मानला जात आहे. चीनच्या संरक्षण मंत्रालयानेही या भेटीसंदर्भात एक निवेदन जारी केले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, चीनचे स्टेट कौन्सिलर आणि संरक्षण मंत्री जनरल ली शांगफू 27 ते 28 एप्रिल दरम्यान नवी दिल्ली येथे होणाऱ्या SCO सदस्य देशांच्या संरक्षण मंत्र्यांच्या परिषदेत सहभागी होतील.
बैठकीदरम्यान जनरल ली परिषदेला संबोधित करतील आणि संबंधित देशांच्या शिष्टमंडळांच्या प्रमुखांनाही भेटतील. जनरल ली संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक देखील घेतील आणि दोन्ही देशातील अडथळे सोडवण्यासाठी लष्करी आणि राजनैतिक चर्चेच्या प्रगतीवर चर्चा करतील.
कमांडर स्तरावरील बैठक सकारात्मक
जनरल ली यांच्या भेटीपूर्वी चीनच्या संरक्षण मंत्रालयाने 23 एप्रिल रोजी चुशुल-मोल्डो सीमा साइटवर झालेल्या चीन-भारत कॉर्प्स कमांडर स्तरावरील बैठकीच्या 18 व्या फेरीबद्दल सकारात्मक प्रतिक्रिया दिली. सीमावर्ती भागात शांतता राखण्यासोबतच पूर्व लडाखमधील दीर्घकाळापासून सुरू असलेल्या अडथळ्याशी संबंधित समस्यांचे निराकरण जलद मार्गी लावण्यास दोन्ही बाजूंनी सहमती दर्शवल्याचे चीनने म्हटले आहे.