पंतप्रधान मोदी, PMO, दलाई लामा यांच्यावर नजर, चीनची हेरगिरी; चौकशीतून मोठा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2020 01:40 PM2020-10-21T13:40:56+5:302020-10-21T14:12:52+5:30
Chinese Espionage Racket : पकडण्यात आलेल्या चीनी हेरगिरांची चौकशी केली असता ही महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
नवी दिल्ली - भारतामधीलचीनच्या हेरगिरीचा आता अत्यंत महत्वाचा खुलासा झाला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान कार्यालयाव्यतिरिक्त, दलाई लामा आणि भारतात लावण्यात आलेल्या सुरक्षा उपकरणांवर देखील चीनी गुप्तहेरांचे लक्ष होते. पकडण्यात आलेल्या चीनी हेरगिरांची चौकशी केली असता ही महत्त्वाची माहिती समोर आली आहे. यामध्ये भारतातील मंत्रालयामध्ये काम करणारे वरिष्ठ अधिकारी आणि ब्यूरोक्रेट्सबाबत माहिती गोळा केली जात असल्याची माहिती उघड झाली आहे.
चीनी हेर क्विंग शीची अधिक चौकशी केली असता चीनने भारतातील हेरगिरांच्या टीमला पंतप्रधान कार्यालयासह मोठ्या कार्यालयांमधील महत्त्वाची माहिती गोळा करण्याचं काम दिलं असल्याची माहिती समोर आली आहे. म्हणजेच कार्यालयामध्ये कोणती व्यक्ती सर्वात महत्त्वाची आहे, कोण कोणत्या पदावर कार्यरत आहे आणि तो किती प्रभावी आहे? अशी माहिती गोळा करण्याबाबत त्यांना सांगण्यात आले होते.
चीनी हेरगिरांच्या टीममध्ये कोलकात्यातील एका महिलेचा समावेश
चीनी हेरगिरांच्या टीममध्ये महाबोधी मंदिरातील एक प्रमुख बौद्ध भिक्षू आणि कोलकात्यातील एका महिलेचा समावेश असल्याचं चौकशीत स्पष्ट होत आहे. क्विंग शी आणि या महिलेची भेट घडवून आणण्यात आली होती. ही महिला क्विंग शीला महत्त्वाची कागदपत्रं देत असे आणि क्विंग ती कागदपत्रं ट्रान्सलेट करून चीनला रवाना करत असे. चीनी हेराच्या चौकशीत काही दस्तावेज सापडले आहेत. त्यानुसार, पंतप्रधान कार्यालयातील एक अधिकारी आणि दलाई लामा यांच्या सर्व कार्यक्रमांची माहिती मिळवली जात होती.
चीनी गुप्तहेराला चीन दरमहा एक लाख रुपये देतं
दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने गेल्या महिन्यात क्विंग शी याच्यासह त्याचा नेपाळी साथीदार शेर बहादूर आणि भारतीय पत्रकार राजीव शर्मा यांना अटक केली होती. हे तिघेही तिहारच्या तुरुंगात आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतात हेरगिरी करण्यासाठी या चीनी गुप्तहेराला चीन दरमहा एक लाख रुपये देत होतं. ज्या दक्षिण दिल्ली भागात क्विंग राहात होती. त्या घराचं भाडं दरमहा 50 हजार रुपये होते. हे भाडे कोण भरत होते याचा तपास केला जात आहे. जुलैमध्येच भारत सरकारने हेरगिरीसाठी वापरल्या जाणार्या 200 हून अधिक चिनी अॅप्सवर बंदी घातली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.