सीमेवर चीनचे हेलिपॅड; पँगाँगजवळ उभारली पक्की बांधकामे, महामार्गांचे रुंदीकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2021 05:55 AM2021-12-22T05:55:15+5:302021-12-22T05:56:11+5:30
पँगाँग सरोवराबाबत भारताशी समझोत्यानंतरही चीनने त्याला लागून असलेल्या भागात पक्की बांधकामे केली आहेत.
नवी दिल्ली : पँगाँग सरोवराबाबत भारताशी समझोत्यानंतरही चीनने त्याला लागून असलेल्या भागात पक्की बांधकामे केली आहेत. चीनने तेथे हेलिपॅडही तयार केल्याचे उपग्रहाद्वारे घेतलेल्या छायाचित्रांतून दिसते. ही छायाचित्रे अमेरिकेच्या परराष्ट्र धोरण मासिकासाठी काम करीत असलेल्या जॅक डिट्च या वार्ताहराने पोस्ट केली आहेत. काही छायाचित्रे ही पँगाँग सरोवराच्या उत्तर किनाऱ्याची आहेत. त्यात जेट्टी, संभाव्य हेलिपॅड व स्थायी बंकर दिसत आहेत. पँगाँग सरोवराच्या फिंगर आठचा भाग वाद निर्माण व्हायच्या आधीपासूनच चीनच्या नियंत्रणात आहे.
मे २०२० मध्ये वादानंतर परिस्थिती सामान्य व्हायला सुरुवात झाल्यावर पँगाँगच्या उत्तर आणि दक्षिण किनाऱ्यापासून लष्कराला परत पाठवले जाईल, यावर भारतीय आणि चिनी लष्कर सहमत झाले. यात फिंगर चारपासून फिंगर आठपर्यंतचा भूभाग समाविष्ट होता. चीनने आता चलाखी केली आहे. ज्या भागासाठी समझोता झाला होता त्याला खेटूनच चीनने हे बांधकाम केले आहे. अरुणाचलातही चीनने मोठे गाव वसवले असल्याचे निदर्शनास आले आहे. चीनने पूर्व लडाखमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ क्षेपणास्त्रे आणि रॉकेट रेजिमेंटही तैनात केले आहेत.
महामार्गांचे रुंदीकरण
अक्साई चीन भागात संपर्क बळकट व्हावा म्हणून चीन महामार्ग बनवत आहे. त्यामुळे त्याला एलएसीवर वेगाने पोहोचता येईल. चीन त्याचे हवाईतळच अपग्रेड करीत आहे, असे नाही, तर त्याने महामार्ग रूंद करणे आणि हवाईपट्टी बनवण्याचे काम सुरू केले आहे.