काश्मीरमध्ये चीनचे षडयंत्र; 'आधारकार्ड'सह चीनी नागरिकाला अटक, महाराष्ट्राशी कनेक्शन!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2022 05:54 PM2022-05-26T17:54:01+5:302022-05-26T17:54:28+5:30
जम्मू-काश्मीरच्या गांदरबल येथून पोलिसांनी एका चीनी नागरिकाला अटक केली आहे.
जम्मू-काश्मीरच्या गांदरबल येथून पोलिसांनी एका चीनी नागरिकाला अटक केली आहे. त्याच्याकडून पोलिसांना भारतीय आधारकार्ड देखील प्राप्त झालं आहे. संबंधित चीनी व्यक्ती भारतात केव्हापासून वास्तव्याला आहे आणि त्याच्याकडे आधारकार्ड कुठून आलं याची माहिती आता पोलीस घेत आहेत. जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटविण्यात आल्यानंतर पाकिस्तान आणि चीनला चांगलीच मिरची झोंबलेली दिसत आहे. जम्मू-काश्मीरमध्ये घुसखोरीच्या घटना वारंवार समोर येताना दिसतात. हा प्रांत काहीही करुन अशांत ठेवण्याचा मनसुबा शेजारील देशांचा आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार अटक करण्यात आलेला चीनी नागरिक लेहमधून श्रीनगरच्या दिशेने जात होता. संबंधित व्यक्तीचं वय ४७ वर्ष असून आपण मुंबईतील एका कंपनीत कामाला असल्याचं त्यानं पोलिसांना सांगितलं आहे. त्यामुळे काही आवश्यक कामासाठी आधारकार्डची गरज भासली आणि त्यानं महाराष्ट्रातच आधारकार्ड तयार करुन घेतलं अशी माहिती त्यानं दिली आहे. हवाई मार्गानं लेहमध्ये दाखल झालो आणि मुंबईला परतण्याची तयारी करत होतो, असंही अटक करण्यात आलेल्या चीनी व्यक्तीनं म्हटलं आहे.
पोलिसांकडून गांभीर्यानं दखल
पोलीस आता या प्रकरणाची गांभीर्यानं दखल घेतली असून चीनी व्यक्तीची कसून चौकशी केली जात आहे. एका अधिकाऱ्यानं नाव न जाहीर करण्याच्या अटीवर दिलेल्या माहितीनुसार संबंधित चीनी व्यक्ती एक गुप्तहेर किंवा एक सामान्य व्यक्ती देखील असू शकतो. याशिवाय काही संशयितांना मोबाइल, वाय-फाय आणि हॉट-स्पॉटचा दुरुपयोग करण्याच्या प्रकरणी चौकशीसाठी पोलीस ठाण्यात बोलविण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं. जम्मू-काश्मीरमधील नागरिकांनी चुकूनही अनोखळी व्यक्तींना आपलं मोबाइल हॉटस्पॉट वापरू देऊ नये, असं आवाहनही पोलिसांनी केलं आहे. तसंच हॉटस्पॉटला भक्कम पासवर्ड द्यावा असंही सांगण्यात आलं आहे.