भारताच्या राशीला चिनी ग्रह; काही घडलेच तर अमेरिका स्वस्थ बसणार नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2022 07:58 AM2022-12-18T07:58:00+5:302022-12-18T07:58:16+5:30
भारत-चीन संबंध तसेच चीन भारताची विविध आघाड्यांवर करू पाहात असलेली कोंडी यांचा विचार अग्रक्रमाने करावा लागेल. १
समीर परांजपे,
मुख्य उपसंपादक
अरुणाचल प्रदेशमधील तवांग क्षेत्रामध्ये चीनच्या सैनिकांनी गेल्या ९ डिसेंबर रोजी घुसखोरीचा केलेला प्रयत्न भारतीय जवानांनी हाणून पाडला. त्याचे आंतरराष्ट्रीय पडसाद उमटले आहेत. दोन्ही देशांनी चर्चेच्या माध्यमातून सीमातंट्यावर तोडगा काढावा, अशी राजनैतिक भूमिका अमेरिकेने घेतली असली, तरी तैवानबाबत अमेरिकेचा पवित्रा मात्र वेगळा आहे. तैवानवर चीनने आक्रमण केल्यास आम्ही तत्काळ लष्करी हस्तक्षेप करू, असे अमेरिकेने याआधी जाहीर केले आहे. याचा मतितार्थ इतकाच आहे की ,भारताविरुद्ध चीनने घुसखोरीच्या पलीकडचे अजून दुःसाहस केले, तर अमेरिका कदाचित भारताच्या बाजूने थेट रणांगणात उतरणार नाही; पण भारताला मोठी लष्करी मदत केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. भारताबरोबर आमचे घनिष्ट संबंध आहेत,
हे अमेरिका सातत्याने सांगत आहे त्यामागे चीनला आशिया व जगात शह देण्याचा असलेला हेतू काही लपून राहिलेला नाही.
भारतासहित १७ देशांबरोबर वाद
भारत-चीन संबंध तसेच चीन भारताची विविध आघाड्यांवर करू पाहात असलेली कोंडी यांचा विचार अग्रक्रमाने करावा लागेल. १५ जून २०२० च्या रात्री गलवान खोऱ्यात झालेल्या संघर्षात चीनचे ४० हून अधिक जवान ठार झाले; तर भारताचे २० हून अधिक जवान शहीद झाले. त्यानंतर दोन्ही देशातील तणाव वाढला होता. तो अजून निवळलेला नाही, याची साक्ष तवांगमधील ताज्या घुसखोरी प्रयत्नातून दिसून आली. भारत व चीनमध्ये सीमेबाबत अनेक वाद आहेत. त्यावर अजून तोडगा निघालेला नाही. चीनची भूमिका पहिल्यापासून विस्तारवादी राहिलेली आहे. त्याचे भारतासहित सुमारे १७ देशांबरोबर वाद आहेत. चीनने तिबेट गिळंकृत केला तसाच प्रयत्न चीन लडाख, अरुणाचल प्रदेशबाबत करताना दिसतो. डोकलाम भागात दोन्ही सैन्य समोरासमोर उभे ठाकले होते.
तळहात व पाच बोटे
माओ त्से तुंग यांनी म्हटले होते की, आम्हाला तळहात व ५ बोटे परत मिळवायची आहेत. तळहात म्हणजे तिबेट व पाच बोटे म्हणजे लडाख, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश, नेपाळ, भूतान. हा अर्थ लक्षात घेतला म्हणजे चीनचे विस्तारवादी धोरण नीट ध्यानात येते. त्यातील तिबेट चीनने गिळंकृत केला. ‘हिंदी-चिनी भाई भाई’चे गोडवे गाणाऱ्या लोकांच्या राजवटीत १९६२ च्या युद्धात चीनने भारताचा मोठा भूभाग बळकावला. या युद्धात भारत पराजित झाला. ती सल अजूनही भारताच्या मनात आहे.
विविध बाजूंनी भारताला घेरण्याचे प्रयत्न
चीनने भारताला विविध बाजूंनी घेरण्याचे प्रयत्न चालविले आहेत. संभाव्य महाशक्तिंमध्ये भारताचा समावेश असून, त्याची आशिया व जगात चीनला सतत स्पर्धा जाणवते. त्यामुळे भारताच्या मार्गात विविध प्रकारे अडथळे आणण्याचे काम चीनकडून सुरू आहे. सध्याचे युग हे विज्ञान-तंत्रज्ञानाचे आहे. चीन संशोधनाबाबत अमेरिका व पाश्चिमात्य देशांपेक्षा मागे आहे. त्यामुळे चीनने हॅकर्स गट स्थापन करून इतर देशांचे तंत्रज्ञान चोरण्याचा, त्यांच्या वेबसाईट हॅक करण्याचा उद्योग सुरू केला.
हेच प्रयोग चीन भारतावरही करत असतो. काही दिवसांपूर्वी दिल्लीच्या एम्स रुग्णालयाचे सर्व्हर चिनी हॅकर्सनीच हॅक केले होते. यंदाच्या वर्षी नोव्हेंबर महिन्यापर्यंत भारतावर १२६७५६४ सायबर हल्ले करण्यात आले. त्यातील बहुतांश हल्ले चिनी हॅकर्सनी केले आहेत. भारत सरकारच्या, लष्कराच्या वेबसाईट, विविध भारतीय कंपन्या, प्रकल्प यांच्या वेबसाईट हॅक करून कामात अडथळे आणणे हा चिनी डाव आहे. पण त्यालाही भारत पुरून उरला आहे.
बनावट चिनी कंपन्यांचा हैदोस
चिनी उद्योजकांनी बनावट कंपन्यांमार्फत भारतीय अर्थव्यवस्थेला पोखरण्याचा प्रयत्न चालविला आहे. दूरसंचार, उच्च शिक्षण, स्मॉल फायनान्स आदी क्षेत्रांत चीनच्या बनावट कंपन्यांनी भारतात अनेक आर्थिक घोटाळे, करचुकवेगिरी केली आहे. कर्जे देण्यासाठी विविध ॲप बनावट चिनी कंपन्यांनी सुरू करून लोकांची फसवणूक केली. त्या चिनी कंपन्यांवर भारताने कडक कारवाई केली आहे. असे आर्थिक सुरुंग चीनने केवळ भारतातच नव्हे, तर अन्य देशांतही पेरून ठेवले आहेत.
चीनही आहे अडचणीत
भारत-चीनमध्ये यंदाच्या वर्षी सप्टेंबरपर्यंत १०० अब्ज डॉलरपेक्षा जास्त व्यापारी उलाढाल झाली. चीनमध्ये मजुरी स्वस्त व कच्चा माल खूप आहे. त्यामुळे तिथून विविध वस्तूंचे उत्पादन करून घेण्याचे धोरण अनेक देशांनी स्वीकारले. यामुळे चीनकडे धनसंचय होत गेला. चीनचा स्वस्त माल भारतातही येऊ लागला. त्याने स्वदेशी उद्योग अडचणीत आले. त्यामुळे सावध झालेल्या भारताने आता चिनी वस्तूंच्या आक्रमणाला थोपविण्यासाठी अनेक उपाय योजले आहेत. आर्थिक, संरक्षण या क्षेत्रात समोरच्या देशाला नामोहरम करण्याचे धोरण चीनने अवलंबले. त्याचा थोडा काळ चीनला फायदा झाला; पण आता कोरोना काळात चीन कोंडीत सापडला आहे.
चीनची कर्जे बुडविली
चीनने आपले शेजारी देश तसेच गरीब देशांना कर्जे देऊन, तेथील विकास प्रकल्पांना तंत्रज्ञान पुरवून आपल्या अंकित करण्याचा प्रयोग केला. लंकेतही नेमके हेच झाले.
चीनच्याविरोधात श्रीलंकेत आता खूप कटू भावना आहे. चीनच्या रियल इस्टेटच्या किमतीत घट झाल्याने त्या देशातील बँकांना २१३ अब्ज डॉलरचा फटका बसला.
चीनने सुमारे १५० देशांना अधिक व्याज दरावर १ ट्रिलियन डॉलरची कर्जे दिली आहेत. यंदाच्या वर्षापर्यंत त्यातील ७० टक्के देशांनी कर्जफेड केलेली नाही. त्यामुळेही चीन अडचणीत आला आहे.
कर्जे चुकवू न शकणाऱ्या पाकिस्तानमधील काही प्रकल्प व भूभाग चीनने ताब्यात घेतला. अन्य देशांबद्दलही चीनचे हेच धोरण आहे. पण त्यातील लबाडी उघडकीस आल्याने चीनविरोधात वातावरण निर्माण होत आहे.
भारत व इतर देशांना घेरण्याच्या प्रयत्नात असलेला चीन स्वतःच्याच जाळ्यात अडकण्याची अधिक शक्यता आहे. त्यामुळे भारताने सजग राहणे आवश्यक आहे.