पाकव्याप्त काश्मीरमध्ये चिनी सैनिक
By admin | Published: March 14, 2016 02:52 AM2016-03-14T02:52:46+5:302016-03-14T02:52:46+5:30
लद्दाख क्षेत्रात सातत्याने घुसखोरी केल्यानंतर चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीचे सैनिक आता पाकव्याप्त काश्मीरमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील आघाडीच्या लष्करी चौक्यांमध्ये वावरत असल्याचे दिसून आले आहे.
श्रीनगर : लद्दाख क्षेत्रात सातत्याने घुसखोरी केल्यानंतर चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीचे (पीएलए) सैनिक आता पाकव्याप्त काश्मीरमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील आघाडीच्या लष्करी चौक्यांमध्ये वावरत असल्याचे दिसून आले आहे. या घटनेबद्दल सुरक्षा यंत्रणेने चिंता व्यक्त केली आहे.
भारतीय लष्कराने उत्तर काश्मीरच्या नौगाव सेक्टरसमोर असलेल्या आघाडीवरच्या चौक्यांवर पीएलएच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना बघितले. त्यानंतर पाकिस्तानी सेनेच्या काही अधिकाऱ्यांचे संभाषण पकडण्यात आले, ज्यात चिनी सैनिक नियंत्रण रेषेला लागून असलेल्या प्रांतात काही बांधकाम करताना दिसत आहेत, अशी माहिती या घटनाक्रमाची माहिती ठेवणाऱ्या सूत्रांनी दिली.
चिनी सैनिक पाकव्याप्त काश्मीरमध्ये उपस्थित असल्याच्या मुद्द्यावर भारतीय लष्कराने अधिकृतपणे मौन पाळलेले असले तरी आपण विविध गुप्तचर संस्थांना नियंत्रण रेषेवर पीएलए सैनिकांच्या उपस्थितीबद्दल सतत माहिती देत आहोत, असेही या सूत्रांनी स्पष्ट केले. गेल्या वर्षाच्या अखेरीस पीएलए सैनिकांना तेथे पहिल्यांदाच पाहण्यात आले होते आणि तेव्हापासून तंगधर सेक्टरसमोर या सैनिकांची उपस्थिती दिसत आहे.
भारताच्या काही सुरक्षा तज्ज्ञांनी पाकिस्तानी सेनेचे अधिकारी आणि पीएलए अधिकारी यांच्या जवळीकीबद्दल चिंता व्यक्त केली आहे.या भागात चिनी सरकारच्या मालकीची चायना गेझौपा ग्रुप कंपनी लिमिटेड ९७० मेगावॉट क्षमतेच्या झेलम-नीलम जलविद्युत प्रकल्पाचे बांधकाम करीत आहे. हा जलविद्युत प्रकल्प उत्तर काश्मीरच्या बांदीपोरा येथे भारतातर्फे तयार केल्या जात असलेल्या किशनगंगा विद्युत प्रकल्पाला प्रत्युत्तर म्हणून स्थापन करण्यात येत आहे. किशनगंगा प्रकल्पाचे काम २००७मध्ये सुरू झाले होते आणि हा प्रकल्प या वर्षी पूर्ण होण्याची आशा आहे.