‘आवारा हूं...’ गाण्यावर थिरकली चीनी पावले; दिल्लीत चीनी नववर्ष साजरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2018 05:39 AM2018-02-11T05:39:59+5:302018-02-11T05:40:35+5:30
भारताच्या बुद्धाने चीनला बोधीसुक्तात गुंफले. दोन्ही देशांमधील आध्यात्मिक बंध तेव्हापासूनचा. बुद्धानंतर चीनी जनमानसावर मोहिनी आहे राज कपूर यांची. ‘आवारा’ राज कपूर आजही चीनी माणसाच्या स्मृतीत आहेत. चीनी नववर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात बॉलीवूडची मोठीच छाप दिसली.
- टेकचंद सोनावणे
नवी दिल्ली : भारताच्या बुद्धाने चीनला बोधीसुक्तात गुंफले. दोन्ही देशांमधील आध्यात्मिक बंध तेव्हापासूनचा. बुद्धानंतर चीनी जनमानसावर मोहिनी आहे राज कपूर यांची. ‘आवारा’ राज कपूर आजही चीनी माणसाच्या स्मृतीत आहेत. चीनी नववर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात बॉलीवूडची मोठीच छाप दिसली. दूतावासातील चीनी कर्मचारी महिलेने ‘आँखे खुली हो या हो बंद...’ हे गीत सादर केले. गायिकेसोबत कलाकारांची पावले थिरकत होती. राज कपूर ते आमिर खानपर्यंतच्या भारत-चीन सांस्कृतिक प्रवासाची ‘मोहब्बते’ सिनेगीतांनी वाढली!
दूतावासातील हिरवळीवर भव्य लाल व्यासपीठ उभारण्यात आले होते. चीनी लाल आकाश कंदिलांचा प्रकाश पसरला होता. अनेक देशांच्या दूतावासातील उच्च अधिकारी तिथे उपस्थित होते. चीनचे भारतातील राजदूत लुओ झाहुई येणाºया प्रत्येकाची विचारपूस करीत होते. परराष्ट्र सचिव विजय गोखले यांचे स्वागतही लुओ झाहुई यांनी केले. भारत-चीन सांस्कृतिक संबंधांचे ज्येष्ठ अभ्यासक प्रा. लोकेश चंद्रा कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी होते.
चीनमध्ये बुद्धाची असंख्य रूपे आहेत. मनाची अवस्था असलेल्या बुद्धाला मानवाच्या प्रत्येक स्वभावातून चीनने साकारले. बुद्धाची विविध रूपे एकाच वेळी १० चीनी कलाकारांनी सादर केली. छोट्या रॉडवर संबंध शरीर तोलत ‘अॅक्रोबॅटिक्स’ सादर करून, चीनी कलाकारांनी अचंबित केले. चीनी कर्मचाºयाने ‘आवारा हूं...’ गाण्याची धून सेक्सोफोनवर वाजविताच, चीनी व भारतीयांनीही त्यास प्रतिसाद दिला. या प्रतिसादामुळे राजदूत लुओ सुखावले. बुद्ध व बॉलीवूडच्या मोहिनीखाली असलेल्या ड्रॅगनचे दुर्मीळ दर्शन उपस्थितांना या वेळी झाले!
भारत समजून घेण्यासाठी..!
बुद्ध व भारतीय कलांचा तुलनामत्क अभ्यास प्र्रा. चंद्रा यांनी केला आहे. संस्कृत, पाली, पर्शियन या भाषांचे उत्तम जाणकार असलेल्या प्रा. चंद्रा यांनी सुमारे ३६० पुस्तके लिहिली आहेत. तब्बल ३५ वर्षांपूर्वी भारताला समजून घेताना (अभ्यास करताना) मी त्यांचीच पुस्तके वाचली होती.
- लुओ झाहुई, चीनचे भारतातील राजदूत