चिनम्माचे मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न भंगणार ?
By admin | Published: February 7, 2017 08:53 AM2017-02-07T08:53:05+5:302017-02-07T08:53:05+5:30
अण्णाद्रमुकच्या सरचिटणीस व्हीके शशिकला तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. पण...
Next
ऑनलाइन लोकमत
चेन्नई, दि. 7 - अण्णाद्रमुकच्या सरचिटणीस व्हीके शशिकला तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. पण त्यांच्या विरोधात सुरु असलेल्या न्यायालयीन खटल्यांमुळे त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या स्वप्नांना सुरुंग लागू शकतो. शशिकला यांच्या विरोधातील बेहिशोबी मालमत्ता प्रकरणात सर्वोच्च न्यायालय पुढच्या आठवडयात निकाल सुनावणार आहे.
तामिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता आणि शशिकला यांची बेहिशोबी मालमत्ता प्रकरणाच्या आरोपातून सुटका झाली होती. या सुटकेला आव्हान देणा-या अनेक याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाल्या आहेत. निकाल विरुद्ध लागला तर, त्यांच्या मुख्यमंत्री म्हणून कायम राहण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होईल आणि राज्यात राजकीय अस्थिरताही निर्माण होईल.
66.65 कोटींच्या बेहिशोबी मालमत्ता प्रकरणात जयललिता, शिशकला, व्हीएन सुधाकरन आणि ईलावारासी हे चौघे आरोपी होते. या चौघांची न्यायालयाने सुटका केली पण या सुटकेला आव्हान देण्यात आले. मागच्यावर्षीय 7 जून रोजी सर्वोच्च न्यायालयाने यासंबंधी निकाल राखून ठेवला होता. तामिळनाडूचे राज्यपाल विद्यासागर रावही नवी दिल्लीहून थेट मुंबईला आले आहेत. ते तूर्तास तामिळनाडूला जाण्याची कोणतीही योजना नाही. त्यामुळे चिनाम्मा म्हणजेच शशिकला यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीला विलंब लागू शकतो.
आताच जयललिता यांच्या मृत्यूबद्दल खुलासा का ?
शशिकला यांच्या शपथविधीपूर्वी अपोलो रुग्णालयाच्या डॉक्टरांनी पत्रकारपरिषद घेऊन जयललिता यांचा मृत्यू रक्तातील संसर्गामुळे झाल्याचे सांगितले. जयललिता यांच्या मृत्यूसंबंधी अनेकांना संशय असून, विविध अफवा सुरु आहेत. त्या पार्श्वभूमीवर रुग्णालयाने पत्रकार परिषद घेऊन हा खुलासा केला. पण जयललिता यांच्या निधनानंतर दोन महिन्यांनी हा खुलासा का केला ? त्याची आता काय गरज निर्माण झाली ? असे अनेक प्रश्न या निमित्ताने निर्माण झाले आहेत.