अम्मांनंतर ‘चिनम्मा’
By admin | Published: February 6, 2017 03:20 AM2017-02-06T03:20:34+5:302017-02-06T03:20:34+5:30
तब्बल तीन दशकांपासून जयललिता यांच्या निकटवर्तीय म्हणून वावरलेल्या शशिकला यांची रविवारी अण्णाद्रमुकच्या विधिमंडळ पक्ष नेतेपदी निवड करण्यात आली आहे
चेन्नई : तब्बल तीन दशकांपासून जयललिता यांच्या निकटवर्तीय म्हणून वावरलेल्या शशिकला यांची रविवारी अण्णाद्रमुकच्या विधिमंडळ पक्ष नेतेपदी निवड करण्यात आली आहे. त्यामुळे तामिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदासाठी त्यांचा मार्ग प्रशस्त झाला आहे. तामिळनाडूत अम्मांनंतर आता चिनम्मा यांचे राज्य असेल. पनीरसेल्वम यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला.
शशिकला एक महिन्यांपूर्वीच पक्षाच्या महासचिव झाल्या होत्या. त्या मंगळवारी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील, असे सांगितले जात आहे. दोन महिन्यांच्या काळात राज्यातील त्या तिसऱ्या मुख्यमंत्री असतील. मुख्यमंत्री पनीरसेल्वम यांनी येथे पक्षाच्या मुख्यालयात आमदारांच्या बैठकीत विधिमंडळ पक्षाच्या नेत्यासाठी शशिकला यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला. आमदारांनी सर्वसंमतीने त्यावर शिक्कामोर्तब केले. शशिकला पक्ष मुख्यालयात दाखल होताच पनीरसेल्वम आणि पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी त्यांचे स्वागत केले. या निवडीनंतर बोलताना शशिकला म्हणाल्या की, ‘जयललिता यांच्या मृत्यूनंतर सर्वात प्रथम पनीरसेल्वम यांनीच मला महासचिवपदासाठी तयार केले. जयललिता यांच्या मृत्यूनंतर पक्षात फूट पडेल, असे विरोधकांना वाटत होते, पण त्यांच्या अपेक्षा फोल ठरल्या आहेत.’ दरम्यान शशीकला यांचे पती नटराजन यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने रात्री उशीरा रूग्णालयात दाखल करण्यात आले.
जयललिता यांच्या मृत्यूनंतर प्रथम पनीरसेल्वम यांनीच मला पक्ष महासचिव आणि मुख्यमंत्री होण्याचा आग्रह केला, पण अम्मांच्या मृत्यूमुळे मी काहीही ऐकू न घेण्याच्या स्थितीत नव्हते. जयललितांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठीच आपण महासचिव होण्यासाठी तयारी दर्शविली. आपल्या अश्रूंना वाट करून देताना त्या म्हणाल्या की, ‘मी अम्मांचे स्वप्न पूर्ण करणार आहे.