चिन्नमांचे भवितव्य ठरणार आजच!
By admin | Published: February 14, 2017 04:15 AM2017-02-14T04:15:53+5:302017-02-14T04:15:53+5:30
मुख्यमंत्री होण्यासाठी उतावीळ झालेल्या अण्णा द्रमुकच्या सरचिटणीस शशिकला यांच्यासंबंधीच्या ६0 कोटी रुपयांच्या बेहिशोबी
नवी दिल्ली/ चेन्नई : मुख्यमंत्री होण्यासाठी उतावीळ झालेल्या अण्णा द्रमुकच्या सरचिटणीस शशिकला यांच्यासंबंधीच्या ६0 कोटी रुपयांच्या बेहिशोबी मालमत्तेच्या खटल्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालय मंगळवारी सकाळी साडेदहा वाजता देणार आहे. या खटल्यात शशिकला दोषी ठरल्यास त्यांना मुख्यमंत्रीही होता येणार नाही आणि कदाचित त्यांची तुरुंगातही रवानगी होईल. मात्र त्या निर्दोष ठरल्यास शपथविधीसाठी राज्यपाल त्यांना पाचारण करतील.
तामिळनाडूतील सत्तासंघर्षात मंगळवार, म्हणजे उद्याचा निर्णय निर्णायक ठरणार आहे. न्या. पी. सी. घोष आणि न्या. अमिताव रॉय यांचे खंडपीठ कर्नाटक सरकारने दाखल केलेल्या एका याचिकेसह अनेक याचिकांवरील आपला आदेश देईल. या खटल्यातील मुख्य आरोपी तमिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता व शशिकला यांच्यासह अन्य तीन आरोपी निर्दोष सुटल्याच्या निर्णयाला याचिकांद्वारे आव्हान दिले गेले आहे. जयललिता आता हयात नसल्यामुळे त्यांच्यावरील खटला संपविला जाईल.
या खटल्यातील आरोपींत शशिकला यांचे नातेवाईक व्ही. एन. सुधाकरन आणि एलावारासी आहेत. खालच्या न्यायालयाने चारही आरोपींना दोषी ठरवले होते, तर कर्नाटक उच्च न्यायालयाने निर्दोष मुक्त केले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निवाड्यावरच शशिकला यांचे राजकीय भवितव्य अवलंबून आहे. शशिकला या जर दोषी आढळल्या तर त्यांना विधानसभेची निवडणूकही लढवता येणार नाही.
शशिकला यांची ५ फेब्रुवारी रोजी विधिमंडळ पक्ष नेतेपदी निवड करण्यात आली. अण्णा द्रमुक पक्षात बहुमत कोणाच्या (मुख्यमंत्री पनीरसेल्वम की शशिकला) पाठीशी आहे याची परीक्षा घेण्यासाठी राज्य विधानसभेचे विशेष अधिवेशन आठवडाभरात बोलवावे, असा सल्ला महाअधिवक्ता मुकुल रोहटगी यांनी राज्यपाल विद्यासागर राव यांना दिला आहे. मात्र तो सल्ला राज्यपालांवर बंधनकारक नाही. सर्वोच्च न्यायालयाने जगदंबिका पाल प्रकरणात विधिमंडळातच आमदार कोणाच्या पाठीशी आहेत याची परीक्षा घेण्यास सांगितले होते. त्याचप्रमाणे राज्यपालांनी एक आठवड्याच्या आत तमिळनाडू विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलवावे, असे मत रोहटगी यांनी व्यक्त केल्याचे सूत्रांनी सांगितले. शशिकला यांनी सरकार स्थापन करण्याचा दावा केल्यापासून राव यांनी गुरुवारपासून निर्णय घेतलेला नाही. (वृत्तसंस्था)