गायीच्या शेणापासून तयार केलेली चिप लॉन्च; मोबाईल रेडिएशन कमी करत असल्याचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2020 09:18 AM2020-10-13T09:18:17+5:302020-10-13T09:18:41+5:30
राष्ट्रीय कामधेनू आयोगाकडून चिप लॉन्च; 'गौसत्व कवच' नावानं विक्री होणार
नवी दिल्ली: राष्ट्रीय कामधेनू आयोगाचे अध्यक्ष वल्लभभाई कथिरिया यांनी काल गायीच्या शेणापासून तयार केलेली चिप लॉन्च केली. या चिपमुळे मोबाईलमधून पसरणारे रेडिएशन कमी होत असल्याचा दावा त्यांनी केला. कथिरिया यांनी काल 'कामधेनू दीपावली अभियाना'ची घोषणा केली. यावेळी त्यांनी गायीच्या शेणापासून तयार करण्यात आलेली अनेक उत्पादनं लॉन्च केली.
उत्पादनं लॉन्च करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात कथिरिया यांनी गायीच्या शेणापासून तयार करण्यात आलेल्या चिपचे फायदे सांगितले. 'गायीच्या शेणापासून तयार करण्यात आलेली चिप तुम्ही मोबाईलमध्ये ठेवू शकता. यानंतर तुमच्या मोबाईलमधून निघणाऱ्या रेडिएशनचं प्रमाण अतिशय कमी होतं. तुम्हाला आजारांपासून दूर राहायचं असल्यास ही चिप अतिशय प्रभावी ठरेल,' असं कथिरिया यांनी सांगितलं. या चिपला गौसत्व कवच असं नाव देण्यात आलं असून त्याची निर्मिती राजकोटमधील श्रीजी गौशाळेकडून केली जाते.
#WATCH: Cow dung will protect everyone, it is anti-radiation... It's scientifically proven...This is a radiation chip that can be used in mobile phones to reduce radiation. It'll be safeguard against diseases: Rashtriya Kamdhenu Aayog Chairman Vallabhbhai Kathiria (12.10.2020) pic.twitter.com/bgr9WZPUxK
— ANI (@ANI) October 13, 2020
राष्ट्रीय कामधेनू आयोग केंद्रीय मत्सोत्पादन, पशुसंवर्धन आणि दुग्धशाळा मंत्रालयाच्या अंतर्गत येतो. गेल्या वर्षी ६ फेब्रुवारीला आयोगाची स्थापना करण्यात आली. गाय आणि गोवंश संरक्षण, संवर्धन करण्याच्या उद्देशानं राष्ट्रीय कामधेनू आयोग स्थापन करण्यात आला. याबद्दलची घोषणा २०१९-२० साठीच्या अर्थसंकल्पात केली गेली.
यावेळी बोलताना कथिरिया यांनी अभिनेता अक्षय कुमारनं काही दिवसांपूर्वी गोमूत्राबद्दल केलेल्या विधानाकडे लक्ष वेधलं. 'मी दररोज गोमूत्र प्राशन करतो, असं अक्षय कुमारनं म्हटलं होतं, हे कदाचित तुम्हाला आठवत असेल. वैद्यकीय कारणांमुळे गोमूत्र प्राशन करत असल्याचं अक्षय म्हणाला होता,' असं कथिरिया यांनी सांगितलं. आयुर्वेदिक औषधांचे विविध फायदे आहेत. मात्र आपण ते विसरले आहोत, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.