शिवसेना बाहेर पडताच NDAतील लोजपानं मोदींना दिला 'हा' सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2019 09:07 AM2019-11-18T09:07:32+5:302019-11-18T09:08:16+5:30
राष्ट्रीय लोकशाही आघाडी(NDA)मध्ये सगळं काही आलबेल नसल्याचं आता समोर आलं आहे.
नवी दिल्लीः राष्ट्रीय लोकशाही आघाडी(NDA)मध्ये सगळं काही आलबेल नसल्याचं आता समोर आलं आहे. विशेष म्हणजे एनडीतले भाजपाचे मित्र पक्षच यावर खासगीत बोलत आहेत. संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर पहिल्या रविवारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीची बैठक झाली. त्यात शिवसेना सहभागी झाली नव्हती. साहजिकच त्याचा प्रभाव बैठकीत पडल्याची चर्चा आहे. बैठकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या मित्रपक्षांनी समन्वय वाढवण्यासाठी समन्वय समितीची मागणी केली आहे. तर दुसरीकडे मोदींनी एनडीएला एक मोठा परिवार असल्याचं म्हटलं आहे. शिवसेना बैठकीत सहभागी न झाल्यानं लोकजनशक्ती पक्षाच्या नेत्यांना त्यांची कमतरता जाणवली.
लोकजनशक्ती पक्षाचे नेते चिराग पासवान यांनी एनडीएच्या मित्र पक्षांमध्ये चांगला ताळमेळ राहावा, यासाठी समन्वयक नेमण्याचा सल्ला दिला आहे. पहिल्यांदा तेलुगू देशम पार्टी (TDP) एनडीएतून बाहेर पडली होती, त्यानंतर उपेंद्र कुशवाहा यांच्या राष्ट्रीय लोक समता पार्टी (RLSP)नं एनडीएचा साथ सोडला होता. आता शिवसेना एनडीएतून बाहेर पडली आहे. तसेच बिहारमध्येही भाजपा आणि नितीश कुमार यांचा पक्ष जेडीयूत मतभेद असल्याच्या बातम्या आल्या होत्या. लोकसभा निवडणुकीनंतर मोदी कॅबिनेटमध्ये एक मंत्रिपद देऊ केलेले असतानाही जेडीयूनं ते नाकारलं होतं. त्याच पार्श्वभूमीवर चिराग पासवान यांनी दिलेल्या सल्ल्याला महत्त्व प्राप्त झालं आहे. एनडीएच्या मित्र पक्षांची विचारधारा वेगवेगळी असू शकते, परंतु ते छोट्या छोट्या मतभेदांनी तिला तडा जाता कामा नये, असंही नरेंद्र मोदी म्हणाले आहेत.
महाराष्ट्रात शिवसेनेसोबत भाजपचा झालेला काडीमोड पाहून लोक जनशक्ती पक्षाने झारखंड विधानसभा निवडणुका स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र एनडीएतून बाहेर न पडल्यामुळे चिराग पासवान बैठकीला हजर होते. बिहारमध्ये भाजप, लोजप आणि जदयू यांचं युतीचं सरकार आहे. शिवसेना एनडीएच्या बैठकांना हजर राहत नव्हती. म्हणूनच आम्ही शिवसेनेला लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहांमध्ये विरोधी बाकावर जागा दिल्याचं प्रल्हाद जोशी यांनी सांगितलं होतं. त्यावर शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनीही त्यांच्या टीकेला उत्तर दिलं होतं. शिवसेनेला या बैठकीचं निमंत्रण देण्यात आलेलं नव्हतं. अशातच शिवसेना एनडीएच्या बैठकीला कशासाठी जाईल? असा प्रतिप्रश्न शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी केला होता.Chirag Paswan, LJP National President after attending NDA meeting, ahead of winter session of Parliament: We have requested Prime Minister to form a NDA(National Democratic Alliance) Coordination Committee or appoint NDA convenor, for better coordination b/w alliance partners. pic.twitter.com/BgpjzApURM
— ANI (@ANI) November 17, 2019
- वाजपेयींच्या काळात होतं समन्वयक पद
माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळापासूनच NDAतल्या मित्र पक्षांमध्ये ताळमेळ राहावा, यासाठी समन्वय पद नियुक्त करण्यात आलं होतं. शरद यादव आणि जॉर्ज फर्नाडिस यांनी अनेक काळ हे पद भूषवलं होतं. 2013मध्ये जेडीयूनं लालूंच्या पक्षाशी असलेली आघाडी तोडली, त्यावेळी शरद यादव यांनी राजीनामा देत दुसरा मार्ग निवडला. तेव्हापासून एनडीएतलं समन्वय पद रिकामं आहे.